विधानसभा निवडणुकीपासून दोन वर्षे अडगळीत राहिलेल्या तावडे यांची पक्षातील या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होणे म्हणजे फडणवीस यांच्या राज्यातील एकाधिकारशाहीचे पंख छाटण्याचे प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मुंबई : भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीत पातळीवर काही महत्त्वाचे बदल आणि नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये भाजपचे माजी आमदार विनोद तावडे यांचे अखेर पुनर्वसन करण्यात आले असून भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारकी नाकारलेल्या तावडे यांची नाराजी दूर करण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजपच्या नव्या राष्ट्रीय समितीची घोषणा करणारे परिपत्रक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी प्रसिद्ध केले. त्या परिपत्रकानुसार विनोद तावडे यांच्यासह झारखंडच्या आशा लकडा, बिहारचे ऋतुराज सिन्हा, पश्चिम बंगालच्या भारती घोष आणि शहजाद पूनावाला यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
राज्यातील भाजपचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील कट्टर विरोधक म्हणून विनोद तावडे ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीपासून दोन वर्षे अडगळीत राहिलेल्या तावडे यांची पक्षातील या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होणे म्हणजे फडणवीस यांच्या राज्यातील एकाधिकारशाहीचे पंख छाटण्याचे प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
भाजपमध्ये फडणवीस यांच्या वाढत्या वर्चस्वाला काही नेत्यांनी आडमार्गाने आक्षेप घेतला आहे. त्यामध्ये पंकजा मुंडे, अॅड. आशिष शेलार, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे आघाडीवर आहेत. फडणवीस यांच्या वाढत्या एकाधिकारशाहीमुळे या नेत्यांना गेल्या सहा वर्षे चांगलाच फटका बसला आहे. तावडे आणि बावनकुळे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. अॅड. शेलार यांना मुंबईऐवजी ठाण्यात महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून पाठवले.
पंकजा मुंडे यांचा विधानसभेला पराभव चाखावा लागला होता. त्यामुळे फडणवीस यांच्याविरोधातील लॉबी चांगलीच सक्रीय झाली आहे. हळूहळू या लॉबीकडे काही अधिकार येऊ लागली आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांना काही दिवसांपूर्वी विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. तर ध्यानीमनी नसताना तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे. याआधी हे पद प्रमोद महाजन यांनी भूषवले होते.
मुंबई महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. असे असताना फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळत म्हणजे २०१६ मध्ये ३३ वरून ८४ नगरसेवकांना निवडणून आणलेल्या अॅड. आशिष शेलार यांना बाजूला सारले. त्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी त्यांनी अतुल भातखळकर यांच्याकडे सोपावली. त्यांच्या दिमतीला दुस-या पक्षातून भाजपात आलेल्या प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना ठेवले.
भाजपत उपरे विरुद्ध निष्ठावंत संघर्ष
फडणवीस यांनी पक्षातमध्ये इतर पक्षांतील अनेकांची खोगीरभरती केली. त्यांच्याकरवी त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात आपल्याला हवी तशी यंत्रणा राबवली. परिणामी प्रदेश भाजपत उपरे आणि निष्ठावंत असा संघर्ष उभा राहिला. त्याची ओरड दिल्लीपर्यंत गेली होती. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे फडणवीसविरोधी आहेत. त्यामुळे फडणवीसविरोधी गटाचे पुनर्वसन होत असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, अलिकडेच फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या एका संगीत चित्रफितीला अमली पदार्थ विक्रेता जयदीप राणा याने वित्तपुरवठा केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्यामुळे फडणवीस बॅकफूटवर गेले आहेत. फडणवीस आपल्याविरोधातील निर्णय पूर्वी दिल्लीला जाऊन फिरवून आणत असत. परंतु आता ही परिस्थिती बदली आहे. आता यापुढील काळ त्यांच्यासाठी कठीण आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.