राजकारण

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी समाजवादी पक्षाला मदत करावी – राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष

उत्तर प्रदेशात लोकशाही नाही — संजय राऊत 

कमलेश गायकवाड नवी दिल्ली —  उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष हा सध्या  भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत  टक्कर  देण्याच्या तयारीत आहे .  भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी     विरोधी पक्षाने समाजवादी पक्षाला मदत  करायला पाहिजे असे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या एका मोठ्या व्यक्तीने  आज खासगीत मत व्यक्त केले .    

उत्तर प्रदेश ,उत्तराखंड ,मणिपूर ,पंजाब , गोवा या ५ राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत . लोकसभेत संख्याबळाच्या दृष्टीने मोठे राज्य उत्तर प्रदेश आहे. येथून लोकसभेत ८० खासदार निवडून येतात . आता उत्तर प्रदेशात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे . भारतीय जनता पक्ष सत्ताधारी पक्ष आहे . मुख्य विरोधी पक्ष समाजवादी पक्ष आहे . यानंतर बहुजन समाज पक्षाचा क्रमांक लागतो . कांग्रेस पक्ष तेथे ४ क्रमांकावर आहे . हे सर्व पाहता उत्तर प्रदेशात सत्ता बदल करण्यासाठी राजकीय पक्षांनी खासकरून भाजप विरोधी पक्षांनी एकत्र विचार विनिमय करून भाजप विरुद्ध लढा दिला पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांने व्यक्त केले .    

भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी समाजवादी पक्ष अन्य समविचारी आणि भाजप विरोधी पक्षाला एका छत्राखाली आणण्याचा विचार करत आहे. समाजवादी पक्ष लहान- लहान पक्षाला जागा देण्याच्या विचारात आहे . अशा राजकीय वातावरणात  राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या नेत्यांनी समाजवादी पक्षाला मदत होईल असे धोरण आखले जावे असे विचार आज मांडले आहेत .    

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज दिल्लीत होते . संजय राऊत यांनी कांग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन राजकीय विषयावर चर्चा केली . या प्रसंगी कांग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने केलेली अटक या विषयावर मी चर्चा केली आहे असे संजय राऊत यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना म्हटले  . मी राहुल गांधी यांच्या बरोबर अनेक विषयावर चर्चा केली  . काही विषय आमच्या दोघात  राहू द्या  असे म्हणत संजय राऊत यांनी भेटीमधील सविस्तर तपशील प्रसार माध्यमाला देण्याचे टाळले . राऊत यांनी काही दिवसापूर्वी कांग्रेस पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष असावा . शरीर आहे पण डोकं नाही अशा आशयाने त्यांनी लेखन केले होते . त्यानंतर राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली . यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झालेले आहे .  

उत्तर प्रदेशात लोकशाही कोठे आहे , लोकशाही व्यवस्था ध्वस्त झालेली आहे असे राऊत म्हणाले . प्रियांका गांधी यांना लखीमपूर येथे हत्याकांड झाल्यानंतर राज्य सरकारने त्यांना अटक केली . त्या बळी पडलेल्या व्यक्तीच्या नातलगांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना अटक करण्यात आली . या अटक प्रकरणावर मी आणि गांधी यांनी चर्चा केली असे राऊत म्हणाले .    

सर्वोच्च न्यायालयातील विद्यमान न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली लखीमपूर हत्याकांडाची चौकशी केली जावी अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली . मी लखीमपूर हत्याकांडाचा निषेध करतो असे शरद पवार म्हणाले . उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या नेतृत्वाखालील लखीमपूर हत्याकांडाची चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे . मात्र ही चौकशी सर्वोच्च न्यायालयातील विद्यमान न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली  व्हावी असे शरद पवार म्हणाले .    

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नव्याने ३ कायदे केले आहेत . त्या कायद्याच्या  विरोधात शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत . त्या विरोधात केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशातील भाजपचे सरकार विरोधात भूमिका घेत आहे . लोकशाही व्यवस्थेत सरकार विरोधात आंदोलन करू द्यायला पाहिजे . विरोधकांचा आवाज दाबायला नको . मात्र भाजपचे सरकार त्यांच्या विरोधात बोलत असताना आवाज दाबत आहे . यामुळे संघर्ष होत आहे .

शांततेच्या  मार्गाने आंदोलन होणे गरजेचे आहे असे शरद पवार म्हणाले .    छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल ,पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांना लखीमपूरला जाऊ दिले नाही असे शरद पवार म्हणाले . केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार लोकशाही मधील संस्थांचा गैर वापर करत आहेत . लखीमपूर घटनेवर मी कांग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि कांग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर चर्चा केली नाही असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल शरद पवार म्हणाले .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखीमपूर मधील घटनेबाबत अद्याप दुःख व्यक्त केले नाही असे पवार म्हणाले . शरद पवार यांनी लखीमपूर मधील हत्याकांडाची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली . 

About the author

वृत्त विभाग दिल्ली

Leave a Reply

Leave a Comment