- नरेंद्र मोदी विरोधात प्रखर बोलणाऱ्यला कांग्रेसमध्ये संधी
नवी दिल्ली ता १९ —
आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी हुतात्मा भगतसिंग यांचा जन्म दिवस २८ सप्टेंबर आहे . त्यांचा जन्म १९०७ साली झाला . त्यांचे जन्मस्थान आज पाकिस्तानमध्ये आहे . भगतसिंग यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार आणि गुजरात मधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी २८ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय कांग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत असे समजले .
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कुमार आणि मेवानी यांनी काँग्रेस पक्षात येण्याचा मनोदय व्यक्त केला . कुमार यांनी अलीकडेच कांग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन राजकीय विषयावर चर्चा केली . बिहारचे कांग्रेस प्रभारी भक्तचरण दास हे कुमार यांच्या संपर्कात आहेत . कुमार यांनी अलीकडेच कांग्रेसचे संघटन विषयक सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाचा मार्ग सुकर होईल यावर चर्चा केली होती .
कुमार यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक बिहार मधील बेगूसराय येथून लढली होती . कुमार यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता . त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे गिरीराज सिंग हे उमेदवार होते . गिरीराज सिंग सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ग्रामीण विकास आणि पंचायतराजमंत्री आहेत . लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल हाती येण्यापूर्वी गिरिराजसिंग हे दिल्ली भेटीवर आले होते . त्यांना विमानतळावर काही पत्रकार भेटले होते . त्यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत चर्चा केली . त्यावेळी माझा पराभव होईल की काय अशी शंका आहे असे त्यांनी खासगीत म्हटले होते . मात्र ते विजयी झाले .
गुजरात विधानसभा निवडणूक २०१७ मध्ये जिग्नेश मेवानी यांनी उत्तर गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती . ते अपक्ष होते . ते विजयी झाले . कांग्रेस पक्षाने या मतदार संघात आपला उमेदवार दिला नव्हता . यामुळे मेवानी यांना विजयी होणे सोपे गेले . ते राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे संयोजक आहेत .
लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी प्रखर बोलले . चौकीदार चोर है असे राहुल गांधी म्हणून मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले . राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त फारसे कोणी मोदी यांच्या विरोधात बोलले नाही . यावर पक्षात बरीच चर्चा झाली . राहुल गांधी जे बोलतात त्यावर माघार घेत नाहीत .हा त्यांचा गुण पक्षातील अनेकांना आवडतो .
यामुळे राहुल गांधी यांनी पुन्हा कांग्रेस अध्यक्ष व्हावे असा विचार पुढे मांडला जात आहे . मोदी एखादी गोष्ट पटवून सांगण्यात माहीर आहेत . राहुल गांधी भाषण करताना मध्येच थांबतात . या उणीवांचा विचार केला गेला आहे . मोदी विरोधात बोलणाऱ्याला आता पक्षात स्थान दिले जाणार आहे . त्याचाच एका भाग म्हणून कुमार आणि मेवानी यांना पक्षात प्रवेश दिला जाणार आहे .
दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आहे . याला इंग्रजीत जे एन यु असे संबोधले जाते . ते केंद्रीय विद्यापीठ आहे . या विद्यापीठात शिक्षण घेणारे बहुतेक विद्यार्थी आणि शिक्षण देणारे प्राध्यापक डाव्या विचारसरणीचे आहेत . नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून या विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचे प्राध्यापक मोठ्या संख्येने भरले गेले आहेत . याच विद्यापीठात कुमार यांनी शिक्षण घेतले आहे . तेथे एका कार्यक्रम देश विरोधी घोषणा देण्यात आल्या या आरोपावरून कुमार याला अटक ही करण्यात आली होती . यानंतर कुमार युवा नेता म्हणून पुढे आले .
कुमार यांना पक्षात घेण्यावरून मतभेद होते . काही जण विरोध करत होते . मात्र सर्व अडथळे पार करण्यात आले आहेत . यामुळे पक्ष प्रवेशाची तारीख २८ सप्टेंबर ठरवण्यात आली आहे असे कळले .