देश-विदेश

करोना साथ अद्याप तीव्रच

Written by news

सीएसआयआर’च्या महासंचालकांचे मत

नवी दिल्ली : भारतात करोनाचे स्वरूप अजूनही साथरोग (पेन्डेमिक) हेच असून त्याचे सौम्य वा मध्यम स्वरूपाच्या साथीमध्ये (एन्डेमिक) रूपांतर झालेले नाही, तसे म्हणणेही धोक्याचे ठरेल. देशात करोनाने ‘एन्डेमिक’च्या टप्प्यात प्रवेश केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे तसे अधिकृतपणे घोषित केले जाईल, अशी माहिती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक शेखर मांडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

करोनाचे स्वरूप ‘एन्डेमिक’ होऊ  लागले असून भारतात करोनाच्या दोन प्रचंड लाट येऊन गेल्या, तशी शिखर गाठणारी लाट येण्याची शक्यता नाही. सौम्य वा मध्यम स्वरूपात करोनाचा संसर्ग होत राहील, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी नुकताच मांडला. जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृतपणे तसे जाहीर केलेले नाही. यासंदर्भात मांडे म्हणाले की, कालांतराने कुठलाही साथरोग सौम्य होत जातो, करोनाही सौम्य होत जाईल. फ्लू साथीप्रमाणे ताप येईल, रुग्ण बरेही होतील. परदेशामध्ये विशेषत: युरोपमध्ये दुसरी-तिसरी लाट येऊन गेल्यानंतर तिथे प्रतिकारशक्ती आल्याने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेले आहे. पण आत्ताच्या घडीला भारतात करोना ‘एन्डेमिक’ झालेला नाही!

सणासुदीच्या दिवसांतील गर्दीमुळे लगेच करोनाची तिसरी लाट येईल असा अंदाज बांधणे चुकीचे ठरू शकेल, असे मांडे म्हणाले.  केरळमध्ये ओणममुळे रुग्णवाढ झाली असे नव्हे, तिथे आधीच रुग्ण वाढलेले होते. तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेइतकी तीव्र व नुकसानदायी नसेल, असे मांडे यांचे म्हणणे आहे.

‘डेल्टा प्लस’ची चिंता नको

करोनाच्या ‘डेल्टा प्लस’ उत्परिवर्तित विषाणूपेक्षा ‘डेल्टा’ अधिक घातक आहे. भारतातच नव्हे तर जगभर डेल्टा हाच प्रभावी उत्परिवर्तित विषाणू आहे. ‘डेल्टा प्लस’चा ‘आर फॅक्टर’ तुलनेत कमी असल्याने त्याचा बाधित करण्याचा वेगही कमी आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी ‘डेल्टा प्लस’वरून लोकांत घबराट निर्माण करू नये. एका करोनाबाधित रुग्णामुळे किती बाधित होतील, यावरून ‘आर फॅक्टर’ ठरतो. ‘डेल्टा प्लस’मध्ये ‘आर फॅक्टर’ कमी असल्याने लोकांनी ‘डेल्टा प्लस’ची चिंता करू नये, असा सल्ला मांडे यांनी दिला.

About the author

news

Leave a Reply

Leave a Comment