निलेशकुमार रामभाऊजी इंगोले
सहायक शिक्षक
जिल्हा परिषद शाळा बऱ्हाणपूर
खरे पाहता लॉक हा शब्द सुरक्षेच्या दृष्टीने ऐकायला बरा वाटतो. दैनंदिन जीवनात घर, गाडी, कपाट अशा विविध गोष्टी कुलूपबंद म्हणजेच लॉक आहेत म्हटलं की सुरक्षित वाटतं. आता तर मोबाईल, कॉम्प्युटर अशा विविध साधनांनाही पासवर्ड ठेऊन लॉक केले जाते. त्यामुळे व्यक्तीला दिलासा मिळतो. कुठे बाहेर जातांना, वस्तूंची काळजी घेतांना दरवाज्याला कुलूप लावले का ? कपाटाला लॉक केले का ? असे वारंवार विचारले जाते. त्यातून मनाला सुरक्षित असल्याचे समाधान वाटते.
बाहेरून घरी आल्यावर घर कुलूपबंद दिसले की आनंद होतो. म्हणजेच सगळे सुरक्षित आहे असे वाटते. परंतु तेच कुलूप म्हणा, लॉक म्हणा उघडे दिसले की, छातीत धडधड होते आणि चोर आला का ? काही चोरी गेले का ? काही नुकसान झाले का ? या भीतीपोटी पळापळ आणि रडारड होते. म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने लॉक असण्याला व्यक्तीच्या जीवनात विशेष महत्त्व आहे.
परंतु कोरोना (covid-19) मुळे जगाला बंद ठेवणारा जो एक लॉक, लॉकडाऊन सर्वांनी अनुभवला तो मात्र वेगळाच होता. गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर असून त्यातून मुक्त होण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहे. या कोरोना काळात जगातील संपूर्ण मानवजातीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जगात लॉकडाऊन करण्यात आला आणि जगाने पहिल्यांदाच हा लॉक, लॉकडाऊन अनुभवला. स्वतःच्या सुरक्षेसाठी नागरिकांना कोरोना काळातील या लॉकमुळे स्वतःच स्वतःला घरात लॉक करून घ्यावे लागले.
या लॉकमुळे सर्व जग काही काळासाठी थांबले होते. या लॉकमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. परंतु हा लॉक सर्व लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यकही होता. कारण आपण कोरोना या महाभयंकर राक्षसाच्या विळख्यात होतो. बाहेरून घरात येतांना कोरोनाचे वाहक बनून आपण स्वतः कोरोनाला घरात आणण्याची शक्यता जास्त होती. पण लॉकडाऊनमुळे बाहेरील कोरोना संसर्ग आणि घरातील लोकांचा संपर्क तुटला व लोकांचा बचाव होऊ शकला.
परंतु आता मात्र हा लॉक, लॉकडाऊन सर्वांना नकोसा झालाय. त्यादृष्टीने आता अनलॉकसाठी पाऊले उचलली जात आहेत. कारण आता कोरोनाचे सावट हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे जनतेचे जनजीवन सुरळीत होण्यासाठी हळूहळू अनलॉक केले जात आहे.
त्यामुळे लोकांमध्ये समाधान आहे. परंतु हे अनलॉक कायम राहण्यासाठी कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढून लॉकडाउन होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी कोरोना वाढवणाऱ्या आपल्या बिनधास्तपणाला प्रत्येकाने लॉक लावला पाहिजे. तरच संपूर्ण अनलॉक राहील. कारण आताही सध्याच्या काळात देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरीयंटचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बिनधास्तपणा सोडून अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
कोरोनाची सुरुवातीची स्थिती अतिशय भयंकर होती व या कोरोनाने लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेत ओढले. सर्वत्र त्याचा झपाट्याने प्रसार झाला आणि मग प्रत्येकाचा जीव वाचविण्यासाठी धडपड व्हायला लागली. या धडपडीत प्रत्येकाकडे असलेल्या अनेक जबाबदाऱ्या, प्रत्येकाचे दैनंदिन जीवनचक्र चालू ठेवत कोरोनाला गंभीरतेने घेण्याची गरज भासली.
अशा परिस्थितीत जनतेची गर्दी देशाला अतिशय गंभीर स्थितीकडे नेऊ शकते असे जाणवले. सुरुवातीस अगदी नगण्य असणारे कोरोना रुग्ण झपाट्याने वाढायला लागले आणि देशाला लॉक केल्याशिवाय पर्याय उरला नाही. या काळात देशालाच नव्हे, तर सार्या जगाला लॉक करावे लागले. मात्र याकाळात देशांतर्गत लॉकडाऊनमुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचे मोठे प्रश्न उद्भवले.
परंतु दुसरीकडे लॉकडाऊनमुळे देशातील जनतेचे जीवनही सुरक्षित राहिले, हेही विसरून चालणार नाही. अन्यथा देशाची काही महिन्यापूर्वीची स्थिती किती भयंकर होती हे आपण अनुभवले आहे.
रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता, बेडची कमतरता जाणवली. प्रसंगी उपचाराअभावी अनेकांना प्राणास मुकावे लागले. अशा काळात आपल्या आप्तजणांना गमावल्याचे महाभयंकर दुःख आपल्याला सहन करावे लागले. कोरोनाने लहानग्यापासून तर वृद्धांपर्यंत अनेकांचे बळी घेतले. काही कुटुंबची – कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेकांचे छत्र हरवले. ही परिस्थिती प्रत्येक नागरिकांनी जवळून पाहिली आहे.
त्यामुळे या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात बिनधास्तपणाने मी सुदृढ आहे, मला कुठलाही आजार नाही, मला काही होणार नाही असे म्हणून कोरोनापासून गाफील राहणे म्हणजे जीवनासाठी धोका पत्करणे आहे. त्यामुळे आपले जीवनचक्र सुरळीत चालण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी व सुरक्षितता ठेवली तर आपण लवकर कोरोनामुक्त होऊ.
परंतु सद्यस्थितीत अनलॉक झाल्याने जीवन पूर्वपदावर येतांना अनेक ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव टाळण्याचे नियम काटेकोर पाळले जात नसल्याचे दिसून येते. ही अतिशय गंभीर बाब आहे. मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, स्वच्छ हात धुणे या गोष्टींची जाण असूनही अनेकदा दुर्लक्ष होतांना दिसते. अनलॉक झाले म्हणजे कोरोना गेला असे नाही. त्यामुळे अनलॉक काळातील आपला बिनधास्तपणा आपल्याला पुन्हा लॉकडाऊनकडे घेऊन जातोय की काय ?
असे वाटते. सध्या १६ ऑगस्टपासून राज्यातील काही निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले असले, तरी कोरोनाचे संकट मात्र टळले नाही. रोज कोरोना रुग्ण आढळतच आहेत. त्यामुळे घराबाहेर पडतांना आवश्यक असलेले निर्बंध पाळणे गरजेचे आहे. कारण उपलब्ध ऑक्सीजन क्षमता, कोरोना रिकव्हरी रेट, रिक्त बेडची संख्या अशा विविध बाबींचे प्रमाण लक्षात घेऊन राज्यात व देशात निर्बंध सैल होत आहेत.
ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या मर्यादेपुढे कोरोना गेला तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन लागण्याचे संकेत प्रसार माध्यमातून ऐकायला मिळते. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून कोरोना टाळण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करून बिनधास्तपणाला आवर घातला पाहिजे. आपल्या देशात कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, पोलिस, नर्स, सफाई कामगार, ड्रायव्हर अशा अनेक कोरोना योद्ध्यांनी नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी दिवस-रात्र संघर्ष केला.
यापैकी काही योद्ध्यांना कोरोनाची बाधा झाली. यात काही बरे झाले, तर काही दुर्दैवाने हुतात्मे झाले. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे बलिदान आपण डोळ्यासमोर ठेवून स्वतःसाठी व आपल्या परिवारासाठी सुरक्षिततेचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. कारण उपचारापेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो. तसेच आपण दक्ष राहून काळजी घेतल्याने आपले कोणतीही नुकसान होणार नाही, उलट आपण अधिक सुरक्षित राहू.
पण यासाठी मात्र प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपली स्वतःची व कुटुंबाची काळजी, सुरक्षिततेची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली तर सर्व देश सुरक्षित राहिल. प्रत्येकाने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, आवश्यक तेथे मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, आवश्यकतेनुसार वेळोवेळी स्वच्छ हात धुणे, योग्य वेळी निर्देशानुसार लस घेणे ही जबाबदारी पार पाडली पाहिजे.
“माझा अनलॉक, माझी जबाबदारी” म्हणून जर प्रत्येकाने कार्य केले, तर कोरोना सारखा आजार बळावणार नाही आणि आपले जीवनचक्र, देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित राहील. प्रत्येक नागरिकाच्या उदरनिर्वाहाच्या जीवनचक्राला बळ मिळेल, जीवन जगण्याला बळ मिळेल व पुन्हा सर्वांना एकत्र येऊन आनंदाने जगता येईल. मग पुन्हा लॉकडाऊन न करताही आपण अशा संकटांशी लढण्यास समर्थ राहू.
पं. स. मोर्शी, जि. प. अमरावती