कोल्हापूरकरांनी गेली 139 वर्षे रंकाळा जीवापाड जतन केला आहे. महापालिकेचा रंकाळा सुशोभीकरणासाठी 15 कोटींचा आराखडा मंजूर झाला असून 9 कोटी 84 लाख निधीही वर्ग झाला आहे. लवकरच सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. तलावाचा हेरिटेज लूक कायम ठेवून रंकाळ्याचे सौंदर्य आणखी खुलविले जाणार आहे.
मुंबईतील क्वीन्स नेकलेसच्या धर्तीवर रंकाळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. रंकाळ्याला रोषणाईने कोल्हापुरी साज रूपात सजविण्यात येणार आहे. चार आकर्षक प्रवेशद्वार तयार केले जाणार आहेत. त्याला शाहूकालीन दगडी कमानीचाही लूक दिला जाणार आहे. शालिनी पॅलेसजवळ, तांबट कमान, जलसंपदा विभागाची जागा, पतौडी खण या ठिकाणी प्रवेशद्वार असतील. त्याबरोबरच शाहू स्मृती उद्यानाच्या अपूर्ण राहिलेल्या कमानीचे कामही पूर्ण केले जाणार आहे. या प्रवेशद्वाराच्या बाजूला दगडी भिंती बांधल्या जाणार आहेत. हेरिटेज लूक असलेल्या कमानी साकारण्यात येणार आहेत.
संपूर्ण रंकाळा फुटपाथ आणि पाथ-वेच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. सुमारे दोन ते तीन मीटरपर्यंत पाथ-वे असणार आहेत. सभोवताली फूट लाईट बसविली जाणार आहे. पाथ-वेवर मर्दानी खेळांची शिल्पे साकारण्यात येतील. यात कुस्तीपासून मल्लखांबसह इतर मर्दानी खेळांचा समावेश असेल. रंकाळा टॉवर ते तांबट कमान यादरम्याच्या भिंतीवरील काही दगड निखळले आहेत. डोम पडले आहेत. त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे.
तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात आता दोन-चार तलाव शिल्लक आहेत. त्यापैकी रंकाळा तलाव म्हणजे कोल्हापूरचा पर्यटनद़ृष्ट्या श्वास म्हणूनच ओळखला जातो.