तालिबाननं आज (7 सप्टेंबर) संध्याकाळी अफगाणिस्तानात सरकार स्थापनेची घोषणा केली. अफगाणिस्तानातील नव्या सरकारचे प्रमुख मुल्ला हसन अखुंद हे असतील, अशी तालिबानच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली.
अखुंद यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये मुल्ला याकूब संरक्षणमंत्री, तर सिराज हक्कानी गृहमंत्री असतील.
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितलं की, “ही एक तात्पुरती व्यवस्था आहे. पुढे पूर्ण सरकार स्थापन करण्याच्या योजनेवर काम केलं जाईल. “
बीबीसी प्रतिनिधी सिकंदर किरमानी यांनी तालिबानच्या नेत्यांच्या हवाल्यानं सांगितलं की, मुल्ला बरादर हे अफगाणिस्तानातील नव्या सरकारचे उपप्रमुख असतील.
तालिबानचं अंतरिम सरकार कसं असेल?
- प्रमुख – मुल्ला मोहम्मद हसन अखुंद
- उपप्रमुख – मुल्ला अब्दुल घनी बरादर आणि मुल्ला अब्दुल सलम हनाफी
- गृहमंत्री – सिराजुद्दीन हक्कानी
- संरक्षणमंत्री – मुल्ला याकूब
- परराष्ट्र मंत्री – आमिर खान मुत्ताकी
“सध्या शूरा परिषद (मंत्रिमंडळ) कामकाज पाहील आणि मग पुढे ठरवलं जाईल की, लोक या सरकारमध्ये कसा सहभाग घेतात,” असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
तालिबानने 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर कब्जा केला आणि त्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या होत्या.
तालिबाननं सोमवारी (6 सप्टेंबर) पंजशीर खोऱ्यावरही ताबा मिळवल्याची घोषणा केली. नॅशनल रेझिस्टंस फ्रंटने तालिबानच्या दाव्याला फेटाळलंय आणि संघर्ष सुरू असल्याचं म्हटलंय.
मात्र, या दाव्या-प्रतिदाव्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे आज (7 सप्टेंबर), तालिबाननं नव्या सरकारची घोषणा केलीय.