मुंबई

नायर रुग्णालय शतक महोत्सवी कार्यक्रमात कोविड नियमांचा फज्जा, मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच निर्बंधांचा विसर

मुंबई, 4 सप्टेंबर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री सातत्याने करत आहेत. मात्र, आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होत असलेल्या कार्यक्रमातच कोविड प्रतिबंधक नियमांची (Covid norms) पायमल्ली झाल्याचं पहायला मिळालं. मुंबईतील नायर रुग्णालयाचा (Mumbai Nair Hospital) आज शतकपूर्ती सोहळा पार पडला. या कार्यक्रमात स्टेजवर मंत्री, प्रशासकीय अधिकारी आणि इतर नेत्यांची गर्दी पहायला मिळाली. स्टेजवर कुठल्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंग (Social distancing norms violation) नसल्याचं यावेळी दिसून आहे.

नायर रुग्णालय शतक महोत्सवी कार्यक्रमला स्टेजवर सोशल डिस्टिंनसिंगचा विसर पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच इतर मंत्र्यासह प्रशासनातील अधिकारी, महापौर मिळून 20 जण एकाच वेळी स्टेजवर उपस्थित होते. नायर हाँस्पिटल प्रशासनालाच कोविड 19 संसर्ग प्रतिबंधक निर्बंधांचा विसर पडल्याचं पहायला मिळालं.

नायर रुग्णालयाचा शतकपूर्ती सोहळा

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या नायर रुग्‍णालयाचा शतकपूर्ती सोहळा मुंबई सेंट्रल येथे पार पडला. या सोहळ्यामध्‍ये मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जर मंत्री, प्रशासकीय अधिकारीच नियमांकडे दुर्लक्ष करत असतील तर इतर सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा करायच्या असा प्रश्न उपस्थित होत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Comment