महाराष्ट्र

पंजाब मधील परिस्थितीवर, शिवसेनेची रोकठोक भूमिका : “आज इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते, तर…”

पंजाबमधल्या राजकीय नाट्यावर आज देशभरात चर्चा सुरू आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी, नवजोत सिंग सिद्धू यांचा राजीनामा अशा एकामागोाग एक घटना घडत असताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर भेटीत चर्चा झाल्याचं जरी सांगण्यात आलं असलं, तरी विरोधकांचं त्यावरून समाधान झालेलं नाही. शिवसेनेनं अमित शाह आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या भेटीवर निशाणा साधतानाच काँग्रेसलाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून या सर्व वादावर शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“जणू विरोधकांचं दिल्लीत डोहाळे जेवणच”

वारंवार दिल्ली वारी करणाऱ्या राज्यातील विरोधकांना शिवसेनेनं यात टोला लगावला आहे. “काँग्रेसचे जे व्हायचे किंवा करायचे ते त्यांचे नेतृत्व करील. पण गिधाडे फडफडावीत तसे काँग्रेसच्या अस्तित्वावर घिरट्या मारण्याचे उद्योग सुरू आहेत. पंजाबमध्ये जे घडलं, ते पश्चिम बंगाल, महाराष्ट्राच्या बाबतीतही घडवण्याचा प्रयत्न होतच असतो. प. बंगालमध्ये अनेकदा सरकारला डावलून विरोधी पक्षाला केंद्राचे लोक चर्चेला बोलावतात. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे लोक ऊठसूट दिल्लीस जातात. जणू विरोधकांचं नित्यनेमाने दिल्लीत डोहाळे जेवणच असतं”, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“…यावर पळवापळवीचे माप ठरते”

इतर पक्षांमधील नेतेमंडळी, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्याच्या वृत्तीवर देखील सामनाच्या अग्रलेखात बोट ठेवलं आहे. “नाराजी सर्वच पक्षांत असते, फक्त वरचे नेतृत्व किती प्रबळ आहे, यावर पळवापळवीचे माप ठरलेले असते. इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते, तर कॅ. अमरिंदर सिंग यांची असे काही करण्याची हिंमत झालीच नसती”, अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.

“राहुल गांधींनी नवजोतसिंग सिद्धूसारख्या येडबंबूच्या…”

दरम्यान, नवजोतसिंग सिद्धू यांच्याबाबत देखील अग्रलेखातून राहुल गांधींना सल्ला देण्यात आला आहे. “वर्षानुवर्षे पदं भोगून सत्तेचा मलिदा खाऊन ढेकर देणाऱ्या म्हातार मंडळाने जी-२३ नावाचा गट स्थापन केला. राहुल गांधींनी जसे या म्हातार मंडळाच्या झांशात येऊ नये, तसे नवजोत सिंग सिद्धूसारख्या येडबंबूच्या नादालाही लागू नये. काँग्रेस पक्षात जुने भरवशाचे लोक म्हातारचळ लागल्याप्रमाणे वागत आहेत, तर सिद्धूसारख्या लोकांचे चित्त ठिकाणावर नाही. पंजाबातील काँग्रेसचा उरलासुरला पायाही हे येडबंबू खतम करतील”, असा सल्ला शिवसेनेनं अग्रलेखातून दिला आहे.

About the author

वृत्त विभाग दिल्ली

Leave a Reply

Leave a Comment