मेट्रो कारशेडला केंद्राची मदत?
मुंबई : राज्यात शिवसेना व भाजपमधील संबंध कमालीचे दुरावले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी अशा बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडे अनुकूल अशी भूमिका घेतल्याने त्या बदल्यात केंद्र सरकार मेट्रो कारशेडच्या जागेकरिता राज्याला मदत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यापासून मुंबई-अहमदाबाद या पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मुद्दा मागे पडला. केंद्र सरकार व नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने गेल्या पावणेदोन वर्षांत राज्य सरकारला अनेकदा स्मरणपत्रे पाठवूनही राज्याने ठाणे व पालघर जिल्ह्य़ांमधील भूसंपादनाच्या प्रक्रियेला मदत केली नव्हती. राज्याच्या या भूमिकेबद्दल भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे व महाविकास आघाडीवर टीकाही केली होती. कांजूरमार्गच्या जागेवर कारशेड उभारण्यास केंद्र सरकार आडवे येत असल्यास वांद्रे-कु र्ला संकु लातील बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित स्थानकाच्या जागेतच मेट्रोचे कारशेड उभारण्याचा इशारा महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आला होता. बुलेट ट्रेन प्रकल्पाला राज्य सरकार सहकार्य करीत नसल्यानेच मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग येथील जागेला केंद्राने आडकाठी आणल्याची चर्चा सुरू झाली होती. सध्या कांजूरमार्गच्या कारशेडच्या जागेचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे.
गेल्या काही दिवसांपासून मात्र बुलेट ट्रेनबाबत राज्य सरकारच्या भूमिकेत बदल झालेला दिसतो. शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महानगरपालिकेने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाकरिता जागा देण्याचा ठराव मंजूर केला. आधी ठाणे महानगरपालिके ने हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला होता.
मुंबई-नाशिक-नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाला राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चारच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात दिली. तसेच मुंबई-हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पात पुणे व औरंगाबादचा समावेश करावा, अशी मागणी केली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ठाण्यातील दिवा परिसरात भूसंपादनास दिलेली मंजुरी, मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनला सहकार्य करण्याची ग्वाही तसेच मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात सुचवलेले बदल यावरून मुख्यमंत्री ठाकरे वा सत्ताधारी शिवसेनेच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूमिकेत बदल झाल्याचेच स्पष्ट होते.
मुंबईत मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी ‘आरे’ची जागा रद्द करण्यात आल्यावर कांजूरमार्गच्या जागेचा पर्याय निवडण्यात आला. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने या जागेत प्राथमिक कामालाही सुरुवात केली. हे काम सुरू झाल्यावर केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने या जागेवर दावा करीत काम थांबविण्याची सूचना केली. केंद्र सरकारने अनुकू ल भूमिका घेतल्याशिवाय कांजूरची जागा राज्याला मिळणार नाही. ‘आरे’चा मुद्दा शिवसेनेने प्रतिष्ठेचा केल्याने तेथे कारशेड उभारली जाणार नाही. गोरेगावच्या जागेचा पर्याय असला तरी कायदेशीर व तांत्रिक अडथळे आहेत. कांजूरमार्गचीच जागा योग्य असल्याचे सरकारचे मत झाले आहे. यातूनच केंद्राच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मदत करून त्या बदल्यात मेट्रो कारशेडकरिता कांजूरची जागा पदरात पाडून घेण्याची खेळी असावी, अशी शक्यता वर्तविली जाते.
संपादित झालेली जमीन..
* मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जागेची आवश्यकता – ४३२.६७ हेक्टर्स
* आतापर्यंत संपादित झालेली जमीन – १३४.३१ हेक्टर्स
* एकूण टक्के – ३१ टक्के