देश-विदेश

भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठी विलगीकरण सक्तीचे; करोना चाचणीही अनिवार्य

भारताचे जशास तसे उत्तर

नवी दिल्ली : 

भारतात येणाऱ्या सर्वच ब्रिटिश नागरिकांना आता दहा दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागेल. त्याशिवाय आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करावा लागेल. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी सोमवार, ४ ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे. 

प्रवासाच्या ७२ तास आधी करोना चाचणी (आरटीपीसीआर) केल्याचा अहवाल ब्रिटिश नागरिकांनी सादर करणे अनिवार्य असेल. तसेच विमानतळावर उतरल्यावर लगेच आणि आगमनानंतर आठ दिवसांनी पुन्हा करोना चाचणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. ब्रिटनने परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी कठोर करोना नियमावली लागू केली होती. ब्रिटनचा हा निर्णय वादग्रस्त ठरला होता. भारत आणि ब्रिटनमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरूनही वाद उद्भवला होता. त्यावर प्रतिक्रियात्मक कृती म्हणून भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. 

आरोग्य आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही जशास तसे धोरण स्वीकारण्याचे ठरवले आहे. ब्रिटनने आधी कोविन लसीकरण प्रमाणपत्रास मान्यता देण्यासही नकार दिला होता.

ब्रिटनने सुरुवातीला ‘कोविशिल्ड’ लशीला नकार दिला होता, नंतर मान्यता देऊनही येथून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या लोकांना आरटीपीसीआर चाचणी आणि दहा दिवसांचे विलगीकरण सक्तीचे करण्यात आले होते. त्यामुळे ब्रिटनमध्येच विकसित झालेल्या लशीच्या आवृत्तीस नकार दिल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. त्यानंतर भारताने याबाबत प्रतिक्रियात्मक कृती करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आता भारताने ब्रिटिश नागरिकांसाठी नियमावली लागू केली आहे.

ब्रिटनने भारतीय नागरिकांसाठी कठोर नियम जारी केल्यानंतर परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला यांनी भारतही प्रतिक्रियात्मक उपाययोजना करील, असे स्पष्ट केले होते. खरेतर कोविशिल्ड लस ही ब्रिटनच्याच अ‍ॅस्ट्राझेनेको आणि ऑक्सफर्ड यांच्या लशीची भारतातील सीरम इन्स्टिटय़ूटने तयार केलेली आवृत्ती आहे. तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे ती भारतात तयार करण्यात आली होती. तरीही लस घेतलेल्या भारतीयांचे प्रमाणपत्र ब्रिटनने फेटाळून त्यांना लसीकरण न झालेले या गटात टाकले होते. त्याशिवाय दहा दिवस विलगीकरण आणि आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली होती.

नियम काय?

* ४ ऑक्टोबरपासून भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांना प्रवासाच्या ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची.

* विमानतळावर उतरल्यानंतर आणि आगमनानंतर आठ दिवसांनी पुन्हा चाचणी करणे बंधनकारक. * भारतात आल्यानंतर लसीकरण झालेले असो वा नसो दहा दिवस विलगीकरण अनिवार्य.

About the author

वृत्त विभाग दिल्ली

Leave a Comment