कोंकण महाराष्ट्र

भौगोलिक मानांकनात रायगडच्या कांद्याची बाजी

अलिबाग : अलिबागच्या रुचकर आणि औषधी गुणधर्म असलेल्या पांढऱ्या कांद्याला अखेर भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून केंद्र सरकारने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. वाडा कोलमला नामांकन मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना पांढऱ्या कांद्यालाही हा दर्जा मिळाल्याने शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे.

पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. या कांद्याच्या लागवडीचे ऐतिहासिक दाखलेही १८८३ सालच्या कुलाबा गॅझेटमध्ये पाहायला मिळतात. येथील शेतकऱ्यांनी या कांद्याचे शुद्ध बियाणे संवर्धित केले आहे.

गेली काही वर्षे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू होते. यासाठी कृषी विभाग, कोकण कृषी विद्यापीठ, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्यात यासाठी एक करार करण्यात आला होता. १५ जानेवारी २०१९ ला पांढऱ्या कांद्याच्या जीआय मानांकनासाठी नोंदणी करण्यात आली होती. अलिबाग पांढरा कांदा उत्पादन संघही स्थापन करण्यात आला होता.

बुधवारी  मुंबई येथील केंद्र सरकारच्या पेटंट रजिस्ट्रार कार्यालयात पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. या बैठकीत अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगौलिक मानांकन बहाल करण्यात आले. या मानांकनामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला स्वत:ची ओळख मिळणार आहे.

कशी होते लागवड?

भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकतो. त्यामुळे शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात. सेंद्रिय पद्धतीने पारंपरिक बियाण्यांचा वापर करून या कांद्याची लागवड केली जाते. साधारणपणे अडीच महिन्यांत कांद्याचे पीक तयार होते. स्थानिक महिला विशिष्ट पद्धतीने या कांद्याच्या माळा विणतात आणि नंतर आकारमानानुसार विणलेल्या या पांढऱ्या कांद्याच्या माळा बाजारात विक्रीसाठी दाखल होतात.

थोडी माहिती

*अलिबाग तालुक्यातील नेऊली, खंडाळे, कार्ले, वाडगाव आदी आठ गावात या कांद्याची लागवड केली जाते.

* हा कांदा उन्हाळ्यातील दोन ते तीन महिनेच बाजारात विक्रीसाठी असतो. याच कालावधीत शेतकरी स्वत:च पुढील वर्षांतील लागवडीसाठी कांद्याचे बियाणे तयार करतात.

*पूर्वी पारंपरिक पद्धतीने या पिकाची लागवड केली जात असे. आता नवे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.

फायदे..  पांढऱ्या कांद्यात औषधी गुणधर्म आहेत.  यात मिथाईल सल्फाइड आणि अमीनो अ‍ॅसिड असते. हे कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते तसेच हृदयाच्या तक्रारी कमी करते. रोज हा कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरताही दूर होते. सर्दी किंवा खोकल्याची समस्या असेल तर ताज्या कांद्याचा रस गूळ आणि मध एकत्र करून दिले जाते. मधुमेहींसाठी हा कांदा उपयुक्त आहे.

कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्याने आमचा हुरूप वाढला आहे. यामुळे कांद्याला राजाश्रय मिळेल. कांद्याच्या मागणीत वाढ होऊ  शकेल. त्यामुळे दरही वाढेल.

– सचिन पाटीलअध्यक्ष पांढरा कांदा उत्पादक संघ

भौगोलिक मानांकनामुळे अलिबागच्या नावाने इतर पांढऱ्या कांद्याची जी राज्यात विक्री होते, आता त्यास आळा बसू शकेल. – उज्ज्वला बाणखेले, कृषी अधीक्षक रायगड

Story With Input From Loksatta Online, Reported by Harshda Kashalkar

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment