तिसरी कसम घेतल्यासारखे कोवीड फिरुन तिसर्या लाटेवर स्वार होऊन थैमान घालण्यास सज्ज आहे. दरवेळेस तो नवनवीन व्हेरियंटसह हल्ला बोल करीत असतो या वेळेस ओमिक्रॉन व्हेरियंटच्या स्वरुपात पसरतो आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक घातक असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुरवातीला कोरोनाव्हायरसचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे कोव्हिड रुग्णसंख्या वाढण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली होती.
ओमिक्रॉन कोरोनाव्हायरसचा आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा म्युटेशन झालेला विषाणू आहे. यामध्ये झालेल्या म्युटेशनची यादी एवढी मोठी आहे की, शास्त्रज्ञांनी याचं वर्णन “भयावह” आणि आतापर्यंतचा कोरोना विषाणूचा हा सर्वांत वाईट प्रकार असल्याचं म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, भारतात फेब्रुवारी 2021 मध्ये आढळून आलेल्या डेल्टा व्हेरियंटमध्ये स्पाईक प्रोटीनमध्ये 8 म्युटेशन आढळून आले होते. मात्र ओमिक्रॉन व्हेरियंटमध्ये डेल्टापेक्षा खूप जास्त प्रमाणात म्युटेशन झालेत.
ओमिक्रॉन व्हेरियंटमध्ये एकूण 50 म्युटेशन आढळलेत. त्यापैकी 30 पेक्षा अधिक स्पाईक प्रोटीनवर आढळल आहेत.
या दोन व्हेरियंटनधील विशेष फरक म्हणजे शरिरातील पेशींच्या ज्या भागाशी विषाणूचा सर्वप्रथम संपर्क येतो, याचा अभ्यास केला असता ओमिक्रॉनमध्ये 10 म्युटेशन, तर जगाला हादरा देणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये या भागात केवळ 2 म्युटेशन झालेले होते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण होण्याची भीती जास्त असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतंय.
राज्यातील परिस्थिती
राज्यात गेल्या दहा दिवसांत रुग्णसंख्या चारपटींहून अधिक वाढली आहे. परंतु तूर्तास नवीन रुग्णांच्या तुलनेत मृत्यू कमी (०.४४ टक्के) असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अहवालात दिसत आहे. २२ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ दरम्यान राज्यात दहा दिवसांत एकूण १५८ मृत्यू झाले, हे विशेष.
देशातील ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत असून येथे दहा दिवसांत झटपट करोनाचे संक्रमण वाढण्याची गती बघता हा विषाणू पाय पसरत असल्याची शंका व्यक्त होत आहे. अहवालानुसार २२ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२० या दहा दिवसांत राज्यात करोनाचे ३५ हजार ८२५ नवीन रुग्ण आढळले.
नागपुरातील बाधितांची संख्या
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात बाधितांची संख्या कमी होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं असतानाच नागपुरात 133 कोरोनाबाधितांची नोंद झाल्यानं प्रशासन काळजीत पडलंय. रविवार 90 कोरोना बाधितांची नोंद झाली होती. यापूर्वी मंगळवार 44 तर शुक्रवार 81 कोरोना बाधित आढळले होते. सहा महिन्यांपासून सातत्याने एक आकडी असलेली कोरोना बाधितांची संख्या अचानक तीन आकडी आली आहे. निर्बंध घातल्यानंतरही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढलीय.
सरकारकडून निर्बंध लावण्यास सुरुवात
राज्यात करोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या वेगाने वाढत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता सरकारकडून निर्बंध लावण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता केंद्र आणि राज्य सरकारने त्यांच्या कार्यालयांसाठी नवीन कोरोना मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे नोंदविली जाणारी हजेरी ३१ जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे. कार्यालयात बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लागत असताना संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. गर्भवती महिलांना कार्यालयात येण्याचे बंअधन नाही.
राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण
भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. कोरोना बाधित लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्या विलग झाल्या होत्या. पण कोरोना चाचणी केली तेव्हा मुंडे यांना कोरोनाची लक्षण आढळली आणि कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाच्या बाबतीत सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाली होती. जे जे आपल्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना चाचणी करावी तसेच काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले होते.
अनेक नेत्यांवर उपचार सुरु
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासह १० मंत्री आणि २० आमदार पाॅझिटिव्ह झाले आहेत.
कोरोनाच्या आताच्या परिस्थितीवर लॉकडाऊनचा निर्णय नाही. लॉकडाऊनविषयी कुठेही चर्चा नाही असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. बेड आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर पुढील निर्णय घेतल्या जातील असेही सांगण्यात आले आहे.