युरोपात महाराष्ट्र गौरव! हवामान बदलावरील प्रयत्नांसाठी मिळाला पुरस्कार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची उपस्थिती
स्कॉटलंड : झपाटयाने वाढणाऱ्या हवामान बदलांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शाश्वत प्रयत्न करणाऱ्या COP26 या जागतिक व्यासपीठाने महाराष्ट्र राज्याने केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली आहे. स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 परिषदेत महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership या पुरस्काराने गौरवण्यात आले. या परिषदेला उपस्थित असलेले राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे.
महाराष्ट्र सरकारने पर्यावरणीय बदल आणि ते रोखण्यासाठी केलेल्या विविध भागीदारी आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांची COP26 परिषदेने विशेष दखल घेतली. COP26 परिषदेत महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो, अशा भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या. या परिषदेला उपस्थित राहून ठाकरे यांनी राज्याने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.