कोंकण

संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासण्यांवर भर द्या-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ आणि ‘टेस्टिंग’ आवश्यक आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासण्यांवर भर द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.


कोविड-19 तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, सीपीआरच्या प्र.अधिष्ठाता डॉ.अनिता सैबन्नावार, एमएसईडिसीएल चे वरिष्ठ अभियंता अंकुश कावळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, जगभरात ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. ओमिक्रॉनबाबत नागरिकांनी गाफील न राहता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता यंत्रणेने त्वरीत पात्र लाभार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिले. 
 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शहर व ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, खाजगी रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या वैद्यकीय सेवा, सोयी -सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी पुरेसा औषधसाठा व वैद्यकीय साधनसामग्री तयार ठेवा. कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपयांची सानुग्रह मदत उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना देवून जिल्ह्यात हे काम चांगले झाल्याबद्दल त्यांनी  कौतुक केले. जिल्ह्यातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण करुन घेण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी यावेळी केल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील सुमारे 2 लाख मुला- मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरुवातीला 12 तालुक्यातील 12 हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक पहिला डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment