साहित्य

समाजाची वैज्ञानिक पातळी खालावलेली, डॉ. जयंत नारळीकर यांची खंत

नाशिक:

फलज्योतिष हे थोतांड असल्याचे सिद्ध झाले असले तरीही आंतरराष्ट्रीय मेळाव्यांतून मंत्री लोक फलज्योतिषाच्या समर्थनाची भाषणे करतात, यावरून समाजाची वैज्ञानिक पातळी किती खालावली आहे हे दिसून येते, असे मत ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.

प्रकृतीच्या कारणामुळे संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकर संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. संमेलनात त्यांचे छापील भाषण प्रसिद्ध करण्यात आले.

विज्ञान समाजापर्यंत मनोरंजक पद्धतीने मांडण्याची गरज असल्याचे सांगून डॉ. नारळीकरांनी भाषणात म्हटले आहे, ” असे लेखन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. काही वृत्तपत्रात आठवड्याचा एक दिवस पानभर मजकूर विज्ञानाबद्दल असतो. काही नियतकालिकांत देखील विज्ञानविषयक माहिती सापडते. अजूनही समाजात विज्ञानाने पाय रोवलेले नाहीत, याची पदोपदी जाणीव होते. खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातला मूलभूत फरक अजून तथाकथित सुशिक्षितांना देखील कळत नाही हे पाहून मन खिन्न होते. ‘तुम्ही फलज्योतिषाला विज्ञान म्हणत नाही याचे कारण तुमची मनोवृत्ती पूर्वग्रहदूषित आहे’ असा आरोप जेव्हा माझ्यासारख्या वैज्ञानिकावर केला जातो तेव्हा हसावे की रडावे हे कळत नाही.

विज्ञानाची शाखा म्हणवून घेऊ इच्छिणाऱ्या विषयाला काही कसोट्यांवर उत्तीर्ण व्हावे लागते. त्या कसोट्या फलज्योतिषाला लावून पाहिल्यावर त्यांत तो विषय अनुत्तीर्ण ठरतो. हे अनेक प्रयोगान्ती अनेक वैज्ञानिकांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. असे असून भारताच्या राजधानीत आंतरराष्ट्रीय मेळाव्यांत फलज्योतिषावर मंत्री लोक समर्थनपर भाषणे देतात यावरून आपल्या समाजाची वैज्ञानिक पातळी किती खालावली आहे याची जाणीव होते.  

पुराणातल्या गोष्टींना वैज्ञानिक आधार नसल्याचे स्पष्ट करताना डॉ. नारळीकर म्हणतात, ‘अपोलो ११ ह्या अंतराळ स्वारीत मानवाने चंद्रावर जाऊन दाखविले. ह्या स्वारीचे सविस्तर वर्णन अनेक वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. अशीच चंद्रावरच्या स्वारीतील हकीकत जूल्स व्हर्नच्या लिखाणात सापडते. समजा, इतर कुठलीही माहिती उपलब्ध नसेल तर ह्या दोन स्वाऱ्यांपैकी वास्तविक कुठली आणि काल्पनिक कुठली ते सांगता येणार नाही.

परंतु जर अधिक खोलात शिरलो तर आपल्याला अंतराळ तंत्रज्ञानाला वाहिलेले विज्ञान आणि गणिताच्या भाषेत लिहिलेले अनेक प्रबंध, अहवाल आणि अभिलेख सापडतील ज्यावरून अपोलो ११ चे यान कसे तयार केले, त्याची एकंदर यात्रा कशी आखली गेली, अंतराळवीरांना कुठल्या कुठल्या चाचण्यांतून जावे लागले वगैरे सर्व तांत्रिक माहिती मिळेल. ह्या दुसऱ्या प्रकारच्या माहितीवरून कुठल्याही तंत्रसमृद्ध संस्कृतीला तशी अंतराळयात्रा आखता येईल. पुराणांतील वर्णने फार तर पहिल्या प्रकारची आहेत, दुसऱ्या प्रकारची नाहीत. पुष्पक विमान तयार करायची नियमपुस्तिका (मॅन्युअल) अद्याप उपलब्ध नाही. वायव्यास्त्र, अग्नेयास्त्र वगैरे कसे बनवले जाते याची कृती महाभारतात सापडत नाही.

सध्या उपलब्ध पौराणिक वाङ्मयातून केवळ इतकेच निदान करता येते की, ते लिहीणाऱ्यांची कल्पनाशक्ती अचाट होती. परंतु त्यापलीकडे जायला हवा असलेला पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही. हा पुरावा का उपलब्ध नाही? याचे कारण बरेच वेळा असे सांगण्यात येते की, आपल्या पूर्वजांनी ती माहिती सांकेतिक भाषेत लिहून ठेवली आहे किंवा ती माहिती नष्ट झाली. अर्थात अशी विधाने तपासून पाहता येत नसल्याने त्यांना वैज्ञानिक तपासणीत काही महत्व राहत नाही. तो केवळ ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न उरतो. तसेच असे विधान जर कोणी केले, “जर पुराणात ही वर्णने आहेत तर ती कल्पनाशक्ती निर्माण व्हायला खरी वस्तुस्थिती तशी नसणार काय?” तर त्या विधानाला उत्तर म्हणून असे म्हणता येईल. “त्या विधानांप्रमाणेच ‘स्टार वॉर्स’ सारखे चित्रपट तशी संस्कृती पृथ्वीवर आहे असे सांगतात.” वास्तविक हे चित्रपट पूर्णतः काल्पनिक असून त्यातील वैज्ञानिक भाग जवळ जवळ शून्य आहे.

“विज्ञान साहित्य म्हणजे काय? याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, ‘वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध किंवा एखाद्या विषयातील पोटशाखेत जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा यांना मी विज्ञान साहित्यात धरत नाही. परंतु एखादा वैज्ञानिक शोध जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान साहित्यात धरेन. अर्थात एखाद्या वैज्ञानिक कल्पनेला मुळाशी धरून त्याभोवती रचलेली कथा किंवा कादंबरी मी विज्ञान साहित्य म्हणून मानली तर त्याबद्दल कोणाचा आक्षेप असू नये.”


डॉ. नारळीकर म्हणतात, ”या आधीच्या शतकात विज्ञानयुगाची चाहूल लागली असे म्हणायला हरकत नाही. टेलिग्राफ, टेलिफोन, आगगाड्या, औद्योगिक क्रांती यांचा अनुभव अनेक देशांना आला होता. अशा पार्श्वभूमीवर जुल्स व्हर्न याने ‘ऐशी दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा’ अशासारखे पुस्तक लिहिले. त्या कादंबरीतील कथानकात वर नमूद केलेल्या वैज्ञानिक साधनांचा उपयोग होताच, परंतु विज्ञान कादंबरी म्हणता येईल असे त्याच्यात काय होते? पृथ्वीप्रदिक्षणा पूर्वेकडे जात केली तर दिवस-रात्र मिळून २४ तासांहून कमी होतात. आजच्या जेट विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला ह्याचा प्रत्यय लगेच येतो. पण जहाजाने हळूहळू प्रवास करताना हे तितकेसे जाणवत नाही. त्यामुळे सबंध पृथ्वीप्रदिक्षिणा करून येणाऱ्याचा एक दिवसाचा कालखंड वाचतो’ ह्या वैज्ञानिक तथ्याचा कथानकात कौशल्याने उपयोग केला आहे म्हणून तिला विज्ञान कादंबरी म्हटले पाहिजे.”

“द्रष्टेपणासाठी लेखक वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञ असायला पाहिजे असे नव्हे’, असे स्पष्ट करून ते म्हणतात, ई.एम. फॉर्टर (ज्यांचे पुस्तक ‘पॅसेज टु इंडिया’ जगप्रसिद्ध आहे.) साहित्यिक होते, विचारवंत होते, पण विज्ञानाचे अभ्यासक नव्हते. मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या वाढत्या वापरामुळे मानव अधिकाधिक यंत्रावलंबी होत चालला आहे हे त्यांना दिसत होते. सहा दशकांपूर्वी ‘यंत्र थांबते’ ह्या कथेत त्यांनी ज्या यंत्रावर मानवी संस्कृती सर्वस्वी अवलंबून आहे, ते यंत्र थांबल्यावर त्या संस्कृतीचे काय हाल होतील याचे चित्र रंगवले आहे. वीजपुरवठा बंद झाला की, न्यूयॉर्कसारख्या ‘अतिप्रगत’ शहरातील लोकांचे कसे हाल झाले याचे प्रात्यक्षिक पाहून ती कथा अतिरंजित वाटत नाही.

परंतु विज्ञानाचे मनोरंजक चित्र समाजापुढे उभे करायचे काम अनेक लेखकांनी केले आहे. विज्ञानाची ओळख जनसामान्यास करून देण्याची प्रथा एकोणीसाव्या शतकात मायकेल फॅरॅडे याने सुरू केली. फॅरडेने भाषणे, प्रयोग, प्रात्यक्षिके, लेखन आदि करून आपले शोध सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्या प्रयत्नांतून जन्माला आलेली विज्ञानसंस्था रॉयल इन्स्टिट्यूशन आजही ते काम चोखपणे बजावीत असते.”

उत्तम आणि निकृष्ट विज्ञानकथा कशा ओळखाव्यात? हे सांगताना डॉ. नारळीकर म्हणतात,  “या प्रश्नाचे उत्तर देताना आपल्याला विज्ञानकथेच्या दर्जाचे भान ठेवले पाहिजे. सर्वच विज्ञानकथा भविष्यद्रष्ट्या नसतात. उत्कृष्टतेचे वेगवेगळे निकष लावले तर फारच कमी कथा त्यात उतरतील. आपण अशा काही निकषांवर दृष्टिक्षेप टाकू या. उत्तम विज्ञानकथेच्या गाभ्यात जे काही विज्ञान असते, ते सध्याच्या माहितीप्रमाणे बिनचूक तर असतेच; पण भविष्यात ते कुठे गेलेले असेल याची पण माहिती देणारे असते. अर्थात हे भविष्याचे आडाखे बिनचूक असतीलच असे नाही. पण ते सध्याच्या माहितीशी विसंगत नसावे. हे आडाखे कितपत बिनचूक होते, ते भविष्यकाळ वर्तमानात पोचला की ठरवेलच.

विज्ञानकथेची क्षमता विज्ञान आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधांवर ती किती भाष्य करते यावरदेखील अवलंबून असावी. आज असे अनेक वैज्ञानिक विषय आहेत. स्टेम सेल संशोधन, उपग्रहांतून टेहळणी, क्लोनिंग, अणुइंधनाचा वापर/ गैरवापर इत्यादी. त्यांचा समाजाशी घनिष्ट संबंध असतो. भविष्यातील चित्रे रेखाटताना विज्ञानकथाकार समाजाला काही वैज्ञानिक संशोधनातून उद्भवणाऱ्या धोक्यांपासून सावध करू शकतो. मी १९७५-७७ दरम्यान ‘पुत्रवती भव’ ही गोष्ट लिहिली होती. त्या गोष्टीत गर्भाचे लिंग ठरवता येण्याची क्षमता मिळाली तर काय गोंधळ उडेल याचे वर्णन केले होते. गर्भलिंग निदानामुळे तशीच परिस्थिती उद्भवलेली आपण पाहतो. गर्भ कन्येचा असल्यास तो पाडण्याचे क्रूर काम होऊ नये म्हणून कायदा करावा लागला. “

About the author

वृत्त विभाग दिल्ली

Leave a Reply

Leave a Comment