महाराष्ट्र राजकारण

साजिशें लाखो बनती है…; महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र सदनप्रकरणी पंकज, समीर भुजबळांना क्लीनचीट

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी आणि या प्रकरणातून आपली नावे वगळण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे भेट घेतली. त्यावेळी दोघांतर्फे भुजबळांचे अभिनंदन करण्यात आले.

मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. “महाराष्ट्र सदन प्रकरण हे जगभर गाजलं. पंचतारांकित हॉटेलसारख्या बांधलेल्या या सदनाचा अनेक राजकीय पक्ष त्याचा वापर करत आहेत. महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटदाराला मंत्रीमंडळाने ठरवले होते की हे बांधकाम झाल्यानंतर तुम्हाला १०० कोटी रुपयांचा एफएसआय देऊ असे सांगितले होते. आजपर्यंत त्या कंत्राटदाराला एक फूट जमिनही मिळालेली नाही. तरीसुद्धा आरोप करुन महाराष्ट्र सदनामध्ये ८०० कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप करण्यात आला. मिडीया ट्रायल सुद्धा झाली. त्यामुळे सव्वा दोन वर्षापेक्षा जास्त काळ आम्हाला तुरुंगामध्ये राहावं लागलं,” असे छगन भुजबळांनी म्हटले आहे.

“आमचा काही दोष नसल्याने आम्हाला या प्रकरणातून वगळ्यात यावं यासाठी वकिलांतर्फे याचिका करण्यात आली होती. त्यानंतर आता आम्हाला या प्रकरणातून निर्दोष म्हणून वगळण्यात आलं आहे. ईडीची कारवाई ही महाराष्ट्र सदन प्रकरणातून पैसे मिळाले यातून ही केस बांधली गेली आहे. अतिशय विनम्रपणे संयम करुन आम्ही या यशाचा स्विकार केला आहे. कुणाही बद्दल आमच्या मनामध्ये द्वेषबुद्धी नाही. कुणाच्याही बद्दल तक्रार नाही. काही वेळेला नियतीच्या मनामध्ये जे असतं त्याप्रमाणे घडतं. साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिये, ये तो आपकी जनता की दुआयें है की उन्हें मुकम्मल नहीं होने देती,” असे म्हणत भुजबळांनी सर्वाचे आशिर्वाद सोबत असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा देत मुंबई सत्र न्यायालयानं दोषमुक्त केलं आहे. याप्रकरणी आपल्याविरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. 

आज मुंबई सत्र न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलं आहे.

या प्रकरणात आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत, असं कोर्टानं आज निर्णय देताना म्हटलं आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातून छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, गीता जोशी, संजय जोशी या सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment