देश-विदेश

दानिश सिद्धीकी ची हत्या अपुऱ्या माहितीमुळे – तालिबान

Written by admin

जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कारविजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा तालिबान आणि अफगाणिस्तानच्या सैन्यादरम्यान झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. मात्र यामागील मुख्य कारण म्हणजे दानिश यांनी तालिबानशी संपर्क करुन समन्वय साधला नाही आणि अफगाणिस्तानमधील आपल्या उपस्थितीची माहिती दिली नाही हे

जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कारविजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा तालिबान आणि अफगाणिस्तानच्या सैन्यादरम्यान झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. मात्र यामागील मुख्य कारण म्हणजे दानिश यांनी तालिबानशी संपर्क करुन समन्वय साधला नाही आणि अफगाणिस्तानमधील आपल्या उपस्थितीची माहिती दिली नाही हे असल्याचं तालिबानच्या प्रवक्त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं आहे. अफगाणिस्तानमधील हेरात आणि कंदाहार शहरांचा ताबा तालिबानने घेतला. तालिबानचे कतारमधील दोहा येथील कार्यालयातील प्रवक्ते मोहम्मद सोहिल साहीन यांनी तालिबानने ९० टक्के अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याचा दावा केलाय.

दानिश यांच्या मृत्यूसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, “आमच्या योद्ध्यांनी त्याला मारलं असं तुम्ही म्हणू शकत नाही. उलट त्याने आमच्याशी संपर्क साधून कॉर्डिनेट का केलं नाही. आम्ही पत्रकारांना अनेकदा सांगितलं आहे की ते जेव्हा या ठिकाणी येतात तेव्हा त्यांनी आम्हाला याबद्दल कळवावे. आम्ही त्यांना सुरक्षा पुरवत जाऊ,” असं सांगितलं. दानिश यांनी अफगाणिस्तानमध्ये येण्यासंदर्भात आमच्याशी समन्वय न साधल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं तालिबानने म्हटलं आहे. “तो काबुलच्या सैनिकांसोबत होता. त्यामुळे तो सुरक्षादलातील होता, सहकारी होता की मीडियावाला होता याने फारसा फरक पडत नाही. दोन्हीकडून झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. मात्र कोणाच्या गोळीबार तो मरण पावला सांगता येणार नाही,” असंही प्रवक्त्यांनी पुढे बोलताना सांगितलं.

आम्ही विटंबना केली नाही

तालिबानी दहशतवाद्यांनी दानिशला फक्त गोळ्याच घातल्या नाही, तर त्यांच्या डोक्यावरून गाडीही चालवल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यासंदर्भात बोलताना तालिबानच्या प्रवक्त्याने हा दावा फेटाळून लावला. “मृतदेहाची विटंबना आम्ही केल्याचा दावा या पूर्वी दोन ते तीनवेळा आम्ही फेटाळलाय. आम्ही असं करत नाही. अफगाणिस्तानच्या सैन्याने आम्हाला बदनाम करण्यासाठी असं केलं असेल. मृतदेहाची विटंबना करणं हे इस्लामच्या नियमांविरुद्ध आहे,” असंही प्रवक्त्याने सांगितलं.

पत्रकार थेट येऊ शकतात का?

पत्रकार थेट तुमच्याशी संपर्क साधून युद्ध सुरु असणाऱ्या या भागांमध्ये येऊन वार्तांकन करु शकतात का असा प्रश्न विचारण्यात आला असता प्रवक्त्यांनी होय असं उत्तर दिलं. “जगभरातील पत्रकार प्रत्यक्षात इथे येऊन वार्तांकन करु शकतात. ते आमच्या परिसरामध्ये शाखा सुरु करुन त्यांच्या डोळ्यांनी घडणारे प्रकार पाहू शकतात,” असंही प्रवक्त्याने सांगितलं.

नक्की काय घडलं?

‘रॉयटर्स इंडिया’चे मुख्य छायाचित्रकार असलेल्या सिद्दिकी यांची १६ जून रोजी हत्या झाली. ते ४० वर्षांचे होते. काही दिवसांपासून कंदहारमध्ये तालिबानी बंडखोर आणि अफगाण सैन्यात सुरू असलेल्या धुमश्चक्रीचे छायाचित्रण ते करीत होते, असे अफगाणिस्तानातील ‘टोलो न्यूज’च्या वृत्तात म्हटले आहे. अफगाणिस्तानची खास सुरक्षा पथके कंदहार प्रांतामधील स्पीन बोल्डाक हा मुख्य बाजारपेठेचा भाग तालिबान्यांच्या ताब्यातून परत मिळवण्यासाठी लढत आहेत. शुक्रवारी पहाटे तेथे तालिबानी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये हल्ले-प्रतिहल्ले झाले. तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात सिद्दिकी यांच्यासह एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला,

कंदाहार तालिबानच्या ताब्यात

अफगाणिस्तानात तालिबानी बंडखोरांची मुसंडी सुरूच असून शुक्रवारी त्यांनी दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहार, हेल्मंडसह आणखी चार शहरे ताब्यात घेतली. तालिबानी सैन्य राजधानी काबूलकडे कूच करीत असून त्यांच्यात आणि सरकारी लष्करी दलांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानमधून दोन दशकांनंतर सैन्य मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर येथे पुन्हा संघर्ष सुरु झालाय.

Photo : तालिबानने त्यांची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. (फोटो : रॉयटर्स आणि ट्विटरवरुन साभार)

About the author

admin

Leave a Reply

Leave a Comment