विचार

स्वातंत्र्य दिन चिरायु होवो…

निलेशकुमार रामभाऊजी इंगोले

प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत सदैव तेवत ठेवणारा सुवर्ण दिवस म्हणजेच १५ ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन होय. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे. दीडशे वर्षे राज्य करून भारताला गुलामीत ठेवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला.

पण भारत देशाची एकता व अखंडता आणि भारतीयांच्या देशभक्तीपुढे झुकून इंग्रजांना १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य प्रदान करून हा देश सोडून जावे लागले. तेव्हापासून भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो.

परंतु या स्वातंत्र्यासाठी भारतीयांना जे बलिदान द्यावे लागले ते खूप अनमोल आहे. आपल्या प्राणाचे बलिदान देऊन थोर हुतात्म्यांनी भारत मातेला मिळवून दिलेले हे अनमोल स्वातंत्र्य कायम टिकून राहावे व त्यांच्या बलिदानाची जाणीव व स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येक भारतीयांच्या मनात सदैव तेवत ठेवण्यासाठी १५ ऑगस्ट या दिनाला विशेष महत्व आहे. म्हणूनच हा दिवस भारताचा राष्ट्रीय सण आहे.

आज आपण उपभोगत असलेले हे स्वातंत्र्य आपल्याला ज्या शूर शहीद आणि महान लोकांनी मिळून दिले त्यामध्ये महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, लाला लजपत राय, सरदार पटेल, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, डॉ. आंबेडकर यासारख्या हजारो देशभक्तांनी मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्याच्या यज्ञात आपल्या प्राणाची आहुती दिली.

परंतु या स्वातंत्र्यासाठी लढतांना या थोर हुतात्म्यांनी कोणताही भेदभाव न ठेवता स्वतंत्र व अखंड भारताचा एकच नारा दिला. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी ते लढले. म्हणूनच ते देशासाठी हे महान कार्य करू शकले. आपला देश जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे.

अनेक धर्म, जाती, भाषा आणि विविध चालीरीतींचे पालन करणारे लोक या देशात राहतात. विविधतेत एकता असणारा आपला देश आहे. या विविधतेतही या थोर पुरुषांनी केवळ भारत मातेचे स्वातंत्र्य व माझा देश हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

हे स्वातंत्र्य अनेक हुतात्म्यांच्या बलिदानाने प्राप्त झाले. हे मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्यालाही जात, धर्म, पंथ, भाषा असे अनेक भेद बाजूला सारून स्वतंत्र व अखंड भारताचा अनमोल ठेवा कायम जपायचा आहे. त्यामुळे देशाच्या प्रत्येक समस्येसाठी एकजुटीने व केवळ भारतीय म्हणून कार्य करणे महत्त्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे, “मी प्रथम भारतीय आहे आणि नंतरही भारतीय आहे.” या उक्तीप्रमाणे प्रत्येक भारतीयाने भूमिका निभावली तर देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहील.

त्यासाठी प्रत्येकाच्या हृदयात प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याची भावना रुजली पाहिजे. हा संदेश आपला भारतीय राष्ट्रध्वज “तिरंगा” आपल्याला सदैव देत राहतो. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा देशाचे महान प्रतीक आहे. तिरंगा ध्वज भारतातील विविध भाषिक, धार्मिक, जातीत विविधतेत एकतेचा प्रतीक मानला जातो. तिरंग्यातील तीन रंगांचा व त्यावरील अशोक चक्राचा अर्थ या देशाची महानता स्पष्ट करणारा आहे.

तिरंग्यातील सर्वात वरील रंग केशरी आहे. केशरी रंग हा निस्वार्थ सेवा, शौर्य आणि अफाट देशभक्तीचे प्रतीक मानला जातो. भारतीयांच्या कर्तुत्वशैलीचे हे द्योतक आहे. म्हणूनच हा रंग लोकशाहीचे प्रतीक मानल्या जातो. तिरंग्यातील मध्यभागी असणारा पांढरा रंग देशाच्या शांतीचे व मानवतेचे द्योतक आहे. तसेच हा रंग सत्यता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. त्याचप्रमाणे स्वच्छता आणि ज्ञानाचा प्रकाशदर्शक आहे.

तिरंग्यातील हिरवा रंग देशाच्या हरितक्रांतीचे प्रतीक मानले जाते. भारतभूमी सुजलाम – सुफलाम असून देशात अन्नधान्यात सदैव समृद्ध व भरभराट असल्याचे दर्शविते. तिरंग्याच्या मध्यभागी असणारे निळ्या रंगाचे अशोकचक्र सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतलेले आहे. यामध्ये २४ आरे आहेत. हे चक्र प्रगतीचे व शौर्याचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच या तिरंग्याचा मान हा प्राणापेक्षाही मोठा आहे. म्हणुच त्याचे गुणगान करतांना
“विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊॅंचा रहे हमारा,
शान न इसकी जाने पाये, चाहे जान भलेही जाये”


असे प्रत्येक भारतीयाकडून म्हटले जाते. राष्ट्रध्वज देशाचे एक प्रातिनिधिक स्वरूप असल्यामुळे देशाचे कर्तबगार व्यक्ती, खेळाडू, भारतीय सैनिक जागतिक स्तरावर याची शान वाढवतात. तेव्हा प्रत्येक भारतीयाची छाती गर्वाने भरून येते. आपला तिरंगा ध्वज आपल्या सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतीक आहे. राष्ट्रीय ध्वज हे राष्ट्राचे प्रतीक स्वरूप असल्याने प्रत्येक नागरिकाने त्याच्या सन्मानासाठी जगले पाहिजे. आज जगात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा, सुरक्षितता, व युद्ध याबाबत वेगाने हालचाली घडून येतांना दिसतात. प्रत्येक देश इतर देशांवर स्वार होऊ पाहत आहे.

सीमावाद, आंतरराष्ट्रीय वाद, इतर देशांची धोरणे पाहता आपला भारत अधिक बळकट असणे आवश्यक आहे. या बळकटीसाठी देशातील नागरिकांची एकता आणि एकात्मता हेच देशाची फार मोठी शक्ती ठरते. आणि ते टिकवून ठेवणे देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य व जबाबदारी आहे. आजही देशाचे शूर सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर सतत उभे आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी हिमालयाच्या शिखरापासून समुद्राच्या पाण्यापर्यंत आणि आकाशापासून जमिनीपर्यंत ते आपले संरक्षण करतात. म्हणून देशातील प्रत्येक नागरिक आनंदाने जीवन जगू शकतो.

त्यांच्या या महान कार्याकरिता आपण अंतर्गत शांतता व सुव्यवस्था ठेवून त्यांना सहकार्य करून त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी व देशाला बळकट करण्यासाठी प्रयत्न करूया आणि देशाला शक्तिशाली आणि समृद्ध करूया. आपल्या देशाच्या समृद्धीबद्दल असं म्हटलं जातं,
“जहाॅं डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसेरा,
वो भारत देश है मेरा…”
अशा भारत देशाला पुर्वीसारखे सुवर्ण पक्षासारखे बनवायचे आहे. त्यासाठी दहशतवाद, आतंकवाद, भ्रष्टाचार, आपसातील वाद यांचा नायनाट करून प्रत्येक भारतीयाने आपल्या कर्तव्याचे व जबाबदारीचे योग्यरीत्या पालन केले पाहिजे. देशांतर्गत शांतता व राष्ट्रीय एकात्मता ही देशाची खरी शक्ती आहे. या शक्तीच्या जोरावर आपण भारताला जगात सर्वश्रेष्ठ ठरवू शकतो.

राष्ट्रीय एकात्मतेच्या शक्तीपुढे आपल्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही व आपला भारत देश संपूर्ण जगात महासत्ता म्हणून समोर येईल. या उदिष्टासाठी प्रत्येक भारतीयाचे आपल्या कर्तव्याचे प्रामाणिक पालन हेच भारतमातेला वंदन असेल. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्वातंत्र्यदिन चिरायु होवो…

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment