कोंकण

हिरवे जगू हिरवे जपू’ चा संदेश देत 16 वर्षीय नितांत चव्हाण चे ११०० किमी सायकल रायडिंग

पुढचं लक्ष कणकवली ते कन्याकुमारी ; नितांतने व्यक्त केला मनोदय


विवेक ताम्हणकर, कोंकण
सतत वाढत चाललेला उष्मांक, पाण्यासाठी करावी लागणारी वणवण, ऑक्सिजनचा जाणवत चाललेला उणेपणा, वाढत चाललेलं प्रदूषण अशा सगळ्या चिंताजनक स्थितीत एक आश्वासक चित्र उभं राहतं ते ‘हिरवे जगू, हिरवे जपू’ चा हरित संदेश घेऊन सायकल राईड करत निघालेल्या कणकवली वरवडे येथील सोळा वर्षीय नितांत राजन चव्हाण याच्या रुपानं. कणकवली ते चिपळुब मुंबई, आणि मुंबई ते पुणे,  कोल्हापूर मार्गे कणकवली असा पूर्वनियोजित ११००  किलोमीटरचा प्रवास आपल्या सायकलने यशस्वीरीत्या पूर्ण करत नितांतने पर्यावरण संवर्धनाचा खूप मोठा संदेश समाजाला दिला आहे.

१ मे महाराष्ट्रदिनी कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पहाटे ५ वाजता नितांतने आपल्या सायकल सफारीला सुरुवात केली आणि शनिवारी १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता तो ही सायकल राईड यशस्वीरित्या पूर्ण करून कणकवली येथे पोहोचला. 


कणकवलीत पोहोचताच ‘आम्ही कणकवलीकर’ ग्रुप मार्फत नितांतचे आप्पासाहेब पटवर्धन चौकात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे,नगरपंचायत बांधकाम सभापती मेघा गांगण, नगरसेविका इंजिनिअर सुप्रिया नलावडे, आम्ही कणकवलीकर ग्रुपचे सदस्य जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर,नगरपंचायत व्यापारी मित्रमंडळ चे राजेंद्र पेडणेकर, दादा कुडतरकर, डॉ.सतीश पवार, हरिश्चंद्र सरमळकर, कनक रायडर्स चे मकरंद वायंगणकर,विष्णू रामागडे, यशवंत भोसले, वसुधा माने, बाळू मेस्त्री,संतोष कांबळे, ग्राहक मंच चे महानंदा चव्हाण, नामदेव जाधव, सुप्रिया पाटील तसेच विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.


नितांत चव्हाण याला लहानपणासून सायकलिंगची आवड. कनक रायडर्स कणकवली या ग्रुपचा तो एक सक्रिय सदस्य. सहावीत असताना राष्ट्रसेवा दलामार्फत आयोजित सायकल राईड मध्ये त्याने कुरुंदवाड कोल्हापूर कणकवली विजयदुर्ग वैभववाडी या 480 किमी राईड मध्ये पहिल्यांदा भाग घेतला आणि तेथून त्याच्या इवल्याशा पंखांना उभारी मिळाली.

त्यानंतर कणकवली ते विजयदुर्ग आणि विजयदुर्ग ते पणदूर कणकवली असा २०० किलोमीटरचा प्रवास त्याने सायकलवरून एका दिवसात पार पाडला. त्याच्या या कर्तबगारीची दखल युनिसेफ या लहान मुलांसाठी काम करणाऱ्या जागतिक संस्थेने घेतली आणि आपल्या वेब पोर्टलवर त्याला मानाचे स्थान दिले.

ही खूप मोठी उपलब्धी होती. त्यानंतर तब्बल १४ महिने सायकलच्या दोन चाकांसोबत अख्खा महाराष्ट्र पालथा घालणाऱ्या प्रणाली चिकटे कडून त्याला प्रेरणा मिळाली आणि तेथून मोठी सायकल राईड करायचं नितांत ने ठरवलं. आणि सुरू झाला कणकवली – चिपळूण -मुंबई आणि मुंबई- पुणे, कोल्हापूर मार्गे कणकवली हा एक ध्येयवेडा प्रवास. 


हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. ऐनवेळी येणाऱ्या साऱ्या संकटांचा सामना करत त्याला आपला प्रवास पूर्ण करायचा होता. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून तो सायकल रिपेयरिंग शिकला. कपडे, जेवणाचे जिन्नस, एनर्जी ड्रिंक,मेडिकल फर्स्ट एड किट, जुजबी सायकल रिपेअरिंग  असे आवश्यक ते सर्व सामान घेऊन त्याने ही राईड सुरू केली होती.

या प्रवासात त्याची अनेक माणसांशी भेट झाली. अनेक नवनवीन रस्ते समजले. खूप ठिकाणं प्रत्यक्षात पाहता आली आणि महत्त्वाचं म्हणजे वेळेचं नियोजन आणि निर्णय कसे घ्यावे, याचे अनेक धडे या प्रवासात त्याला सापडल्याचे तो सांगतो. रस्त्यांची दशा, चौपदरीकरण झाल्यामुळे झालेली वृक्षतोड त्याला अस्वस्थ करून गेली. महाड – वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक येथे सुरू असलेल्या राष्ट्रसेवा दलाच्या शिबिरात त्याचा हा प्रवास तेथील शिबिरार्थींनी जाणून घेतला. मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथे त्याच्या या ध्येयवेड्या प्रवासाबाबत मुलाखतीद्वारे जाणून घेऊन त्याच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रवासात त्याला अनेक घाट लागले, वातावरण बदलाचा परिणाम जाणवला, सायकलची चैन तुटली तरीही साऱ्या संकटांचा सामना तेवढ्याच आत्मविश्वासाने करत त्याने आपली रायडिंग यशस्वी केली. पहाटे ५ वाजता त्याचा सायकल प्रवास सुरु व्हायचा. दुपारी १ ते ४ जेवण आणि विश्रांतीसाठी थांबून ऊन कमी होताच पुन्हा त्याचा प्रवास सुरु व्हायचा. मग रात्री ८ वाजेपर्यंत आपलं लक्ष गाठायचं, असा त्याचा दिनक्रम. कणकवली – रत्नागिरी – रायगड – पालघर – ठाणे – मुंबई – पुणे- कोल्हापूर – कणकवली असा प्रवास करत त्याने आपलं ध्येय पूर्ण केलं.

एका दिवशी साधारण १२० किलोमीटरचा प्रवास त्याने केलाय. पुणे ते उंब्रज हा १४६ किलोमीटरचा प्रवास त्याच्या या १४ दिवसांच्या प्रवासातील एका दिवसात केलेला सर्वांत जास्त प्रवास. एवढं दमल्यानंतरही समाधानाचं हासू त्याच्या चेहऱ्यावर असायचं, हेच त्याच्या यशस्वीतेमागचं गमक आहे. वाटेत अनेक ठिकाणी त्याचे सत्कार करून त्याला त्याच्या कामाची पोचपावतीच देण्यात आली. 


‘हिरवे जगू हिरवे जपू’ चा संदेश देत सायकल प्रवास करणाऱ्या नितांतला त्याचे पत्रकार वडिल राजन चव्हाण आणि उपक्रमशील प्राथमिक शिक्षिका सरिता पवार यांची खूप मोठी साथ आणि मार्गदर्शन मिळत आहे. माझ्या या हजारभर किलोमीटरच्या सायकल प्रवासमागे माझ्या कुटुंबाची साथ खूप मोलाची आहे, असे नितांत अभिमानाने सांगतो.

यापुढे अजून खूप मोठ्या पल्ल्यांचा प्रवास करायची त्याची इच्छा आहे. कणकवली ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास करणार असल्याचा मनोदय नितांतने व्यक्त केला. ‘सोळावं वरीस धोक्याचं’ असं म्हटलं जातं. परंतु नितांतने आपल्या कामाने हे फोल ठरवलं आहे.

तो फक्त निसर्ग संवर्धना चा संदेश देत नाही तर सायकल प्रवास करत असताना सिड बॉल करून मोकळ्या माळरानावर हिरवाई फुलविण्यासाठीही तो सतत कार्यरत असतो. आपल्या सायकल प्रवासाद्वारे निसर्ग संवर्धनाचा संदेश देणाऱ्या नितांत चव्हाण याचा प्रवास अबालवृद्धांसाठी प्रेरणादायक असाच आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment