ताकारी – म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या ५ व्या सुधारित प्रकल्प अहवालाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये ताकारी उपसा सिंचन योजनेसाठी १७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शेतकर्यांना थेट बांधावर पाणी देण्यासह पोटकालव्यांचे अस्तरीकरण व भूसंपादन करण्यात येणार असल्याची माहिती ताकारी उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.
सन २०१७ मध्ये कृष्णा-कोयना महामंडळाकडून ताकारी-म्हैसाळ योजनेचा ४ सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला होता. या अहवालानुसार शासनाने ४९५९ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिलेली होती. या निधीतून मुख्य कालवा खोदाई, पोटपाट, अस्तरीकरण, बंदिस्त पाईपलाईन, भूसंपादन यासारखी कामे करण्यात आली आहेत.
त्यानंतर पुन्हा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाटबंधारे विभागाने ताकारी-म्हैसाळ योजनेसाठी ५ वा सुधारित प्रकल्प अहवाल तयार करून शासनाला सुपूर्द केला होता. रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालानुसार ८२३४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार ताकारी योजनेच्या वाट्याला १७५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या निधीतून शेतकर्यांना थेट बांधावर पाणी देण्यात येणार आहे. तसेच शंभर हेक्टरपेक्षा जास्त लाभक्षेत्र असलेल्या पोटपाटांचे अस्तरीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय काही रक्कम भूसंपादनासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती डवरी यांनी दिली.
८२ कोटींची योजना गेली १३२२ कोटींवर ताकारी योजनेची सुरुवात झाली त्यावेळी योजनेचा आराखडा ८२ कोटींचा होता. त्यामध्ये काही वर्षांच्या अंतराने वाढ होत जावून योजनेचा आराखडा १३२२ कोटींवर गेला आहे. योजनेसाठी राज्य शासनासह केंद्र सरकारच्या एआयबीपी व प्रधानमंत्री सिंचन योजनेतून निधी खर्च करण्यात आला आहे.