शिक्षण

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून शिवाजी विद्यापीठास २.५ कोटींचा प्रकल्प

‘केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून शिवाजी विद्यापीठास २.५ कोटींचा प्रकल्प

स्तुती’ उपक्रमांतर्गत मंजुरी

कोल्हापूर प्रतिनिधी


केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘स्तुती’ या विशेष प्रशिक्षण उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठास सुमारे अडीच कोटी रुपयांचा प्रकल्प तत्त्वतः मंजूर करण्यात आला आहे.

ही माहिती विद्यापीठाच्या सैफ (SAIF), सीएफसी विभागांचे प्रमुख डॉ. आर.जी. सोनकवडे यांनी दिली.
डॉ. सोनकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पकालीन अभ्यासक्रम आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून विविध उपकरणे आणि विश्लेषणात्मक तंत्रांबद्दल लोकप्रियता आणि जागरूकता वाढविण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ‘स्तुती’ (STUTI – Synergistic Training program Utilizing the Scientific and Technological Infrastructure) या प्रशिक्षण उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी शिवाजी विद्यापीठाकडून प्रकल्प प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मंजुरी प्राप्त झाल्याचे पत्र विद्यापीठास प्राप्त झाले आहे. एक वर्षाच्या कालावधीसाठी असणाऱ्या या प्रकल्पातील उपक्रम ‘आझादी का अमृतमहोत्सवां’तर्गत साजरे करण्यात येणार आहेत.

या प्रकल्पाअंतर्गत किमान ३० जणांचा सहभाग असणाऱ्या एकूण २५ प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच, दि. २२ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या विज्ञान सप्ताहांतर्गत किमान ५० सहभागींसाठी १४ जागरूकता शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमांसाठी मंत्रालयाकडून २५१.८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या प्रकल्पाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीमध्ये डॉ. सोनकवडे यांच्यासह नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागातील डॉ. के.डी. पवार आणि डॉ. टी.डी. डोंगळे हे सह-अन्वेषक म्हणून काम करणार आहेत.

संशोधक, विद्यार्थ्यांसह उद्योजक-व्यावसायिकांनाही लाभ: कुलगुरू डॉ. शिर्के


या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रात डीएसटी-सैफ उपक्रमांतर्गत विविध अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे विश्लेषणासाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.

त्यांचा जास्तीत जास्त उपयुक्त वापर शैक्षणिक संशोधनासह उद्योग-व्यवसाय क्षेत्रासाठीही व्हावा, त्या संदर्भात यथायोग्य जनजागृती व्हावी, या हेतूने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘स्तुती’ उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.

डॉ. सोनकवडे यांनी या विभागांचा पदभार स्वीकारल्यापासून हा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी सातत्याने विविध कार्यशाळा, शिबिरे घेऊन ते संशोधक, विद्यार्थ्यांसह विविध समाजघटकांना मार्गदर्शनही करीत असतात. संशोधकीय अनुभवाचा लाभ देत असतात. ‘स्तुती’ उपक्रमामुळे विद्यापीठाच्या या प्रयत्नांना अधिक पाठबळ लाभले आहे. या उपक्रमांत सहभागी होण्याची संधी संशोधक, विद्यार्थी यांच्यासह उद्योग-व्यवसाय क्षेत्रांनीही घ्यावी, असे आवाहनही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी या निमित्ताने केले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment