देश-विदेश

तालिबानची भारताला धमकी : “अफगाणिस्तानी लष्कराच्या मदतीसाठी आलात तर…”
भारताने अफगाणिस्तानला केलेल्या मदतीसंदर्भातही तालिबानचा कतारमधील दोहा येथील कार्यालयातील प्रवक्ता मोहम्मद सोहिल साहीनने भाष्य केलंय

अफगाणिस्तानमध्ये सरकारी लष्करी दल आणि बंडखोर तालिबानमध्ये संघर्ष सुरुच आहे. असं असतानाच शुक्रवारी तालिबानने अफगाणिस्तानमध्ये मुसंडी मारुन दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहार, हेल्मंडसह आणखी चार शहरे ताब्यात घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर एएनआय या वृत्तसंस्थेनं तालिबानचा कतारमधील दोहा येथील कार्यालयातील प्रवक्ता मोहम्मद सोहिल साहीनने केलेल्या चर्चेमध्ये भारतालाही धमकावले आहे. भारताने अफगाणिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न करु नये असा इशाराच तालिबानने दिला आहे.

“जर ते अफगाणिस्तान लष्कराच्या मदतीला आले किंवा त्यांनी इथे आपली उपस्थिती दाखवली तर त्यांच्यासाठी (भारतासाठी) हे चांगलं ठरणार नाही. त्यांनी अफगाणिस्तानमध्ये इतर देशांनी सैन्य पाठवलं तेव्हा काय घडलं हे पाहिलं आहे. हे सर्व प्रकरण त्यांच्यासाठी एखाद्या खुल्या पुस्तकाइतकं स्पष्ट आहे,” असं साहीन म्हणाला आहे.

पुढे बोलताना साहीनने भारताने अफगाणिस्तानला केलेल्या मदतीसंदर्भात भाष्य केलं आहे. “त्यांनी (भारताने) अफगाणिस्तानमधील लोकांना आणि देशातील राष्ट्रीय प्रकल्पांना मदत केली आहे. त्यांनी यापूर्वीही मदत केलीय. त्याचं आम्हाला कौतुक आहे,” असंही साहीनने तालिबानची भूमिका मांडताना म्हटलं आहे.

हा प्रश्न तुम्ही भारत सरकारला विचारा…

साहीनने यापूर्वीच एनडीटीव्हीशी संवाद साधला. त्यावेळी भारताला तुम्ही मित्र मानता की शत्रू?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना प्रवक्ते मोहम्मद सोहिल साहीनने हे तुम्ही तुमच्या सरकारलाच विचारलं पाहिजे असं म्हटलं आहे. “तुम्ही हे तुमच्या सरकारला विचारलं पाहिजे की ते तालिबानला मित्र मानतात की शत्रू. जर भारत अफगाणिस्तानमधील जनतेला आमच्याविरोधात लढण्यासाठी बंदूका, शस्त्र आणि स्फोटके पुरवत असेल तर आम्ही याकडे वैर भावनेतून केलेली कारवाई अशा दृष्टीकोनातूनच पाहू. मात्र भारताने अफगाणिस्तानमधील शांतता आणि भरभराटीसाठी काम केलं त्याला आम्ही वैर भावना म्हणणार नाही. काय ते भारताने ठरवावं,” असं प्रवक्त्याने सांगितलं.

भारताची तालिबानशी चर्चा सुरु आहे का या प्रश्नावरही साहीनने उत्तर दिलं. “होय, आम्ही पण बातम्या ऐकल्या की भारतीय अधिकारी दोहा आणि इतर ठिकाणी तालिबानशी चर्चा करत आहेत. मात्र याची खात्रीशीर माहिती माझ्याकडे नाही. मात्र मी ठामपणे हे सांगू शकतो की काल झालेल्या एका बैठीला भारतीय अधिकारी आणि तालिबानी प्रतिनिधी उपस्थित होते,” असं प्रवक्ता म्हणाला.

दहशतवाद्यांना मदत करणार…

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यास आमच्या देशामधून आम्ही आयएसआयएस आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांना काम करण्यास परवानगी देऊ, असंही तालिबानने स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानकडून मदत मिळत असल्याचा दावा प्रवक्त्याने फेटाळून लावला. “तुम्ही म्हणता आम्हाला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. मात्र माझ्यामते तुम्ही असं म्हणत आहात कारण तुमचे पाकिस्तानशी वैर आहे. तुम्ही हा दावा अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहून केलेला नाहीय,” असं प्रवक्त्यांनी सांगितलं.

१९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवणाऱ्या तालिबानला अमेरिकेने जवळजवळ संपवलं होतं. इस्लामिक शिरिया कायद्यानुसार तालिबान कारभार करतं. यामध्ये महिलांना कामाची तसेच शिक्षणाची परवानगी नसते. पुरुष नातेवाईक सोबत असेपर्यंत महिला एकटी घराबाहेर पडू शकत नाही. पुरुषांनी दाढी वाढवून डोक्यावर गोलाकार टोपी घालणं बंधनकारक असतं. मनोरंजनाची साधने वापरण्यावर बंदी असते. याचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा केली जाते. अमेरिकेने दणका दिल्यानंतर तालिबान्यांनी पाकिस्तानचा आश्रय घेतल्याचं सांगण्यात येतं.

About the author

admin

Leave a Reply

Leave a Comment