बारामती – चारचाकीच्या डिकीतून इंदापूरहून बारामतीमार्गे सासवडला नेला जाणारा दहा लाख रुपये किमतीचा ५० किलो गांजा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. बारामती तालुका पोलिसांनी ही कारवाई बारामती शहरानजीक रुई पाटी येथे केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारचाकी चालक सचिन दिलीप रणवरे (वय३५, रा. हिवरकर मळा, सासवड, ता. पुरंदर) व सुनिता प्रताप चव्हाण (वय ३५, रा. सणसवाडी, ता. शिरुर, मूळ रा. माहूरगड, ता. पुसद, जि. नांदेड) या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १० लाख रुपयांच्या गांजासह पाच लाखाची स्विफ्ट कार असा १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे हे स्वतः या कारवाईवेळी उपस्थित होते. इंदापूरच्या दिशेने रुई गावातून आलेली स्विफ्ट कार (एमएच-१२, जेएस-००९०) ही थांबवत तिची तपासणी केली असता पोलिसांना त्यामध्ये ५० किलो गांजा आढळून आला.
पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अपर अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, सपोनि योगेश लंगुटे, राहूल घुगे, सहाय्यक फौजदार साळवे व कर्मचाऱयांनी ही कारवाई केली.