पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातील ६४४ पशुपालकांना दीड कोटींची मदत

सांगली – जिल्ह्यात लम्पीस्कीनची लागण होऊन मृत्यू झालेल्या ६४४ जनावरांच्या पशुपालकांना शासनाकडून १ कोटी ५१ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधितांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

गेल्या तीन महिन्यापासून जिल्ह्यात लम्पीस्कीनचे संकट आले आहे. गाय आणि बैल असे एकूण १ हजार २३० जनावरांचा या आजाराची लागण होऊन मृत्यू झाला आहे. या पशुपालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. लम्पीची लागण होऊन मृत्यू झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना शासनाकडून मदत देण्यात येत आहे. गायीच्या पशुपालकांना ३० हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत देण्यात येत आहे. तसेच बैलासाठी २५ हजार आणि वासरांच्या पशुपालकांना १६ हजार रुपये संबंधितांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत.

जिल्ह्यात मृत्यू झालेल्या १२३० पैकी ७९० जनावरांच्या पशुपालकांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. यातील ६४४ पशुपालकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत. अद्यापही ५८६ पशुपालक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात रविवारी नव्याने ०५३ जनावरांना लम्पीस्कीनची बाधा झाली आहे. तसेच १ हजार २३० जनावरांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार २१४ जनावरांना लम्पीस्कीनची लागण झाली आहे. ९ हजार ५७ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. सध्या ४ हजार ९२७ पशुधनांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बाधित जनावरांच्या पशुपालकांना मदत मिळवून देण्यासाठी समिती स्थापना करण्यात आली आहे. त्या समितीमार्फत पडताळणी करून आर्थिक मदत देण्यात येत आहे. मात्र आज जनावरांच्या किंमती लाखों रुपयांच्या घरात आहेत. मात्र शासनाकडून तुटपुंजी मदत मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांतून संतापाची लाट उसळली आहे. लम्पीस्कीनचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment