राजकारण

गोव्याच्या इतिहासातील अटीतटीची लढत, भाजपला नेता, तर आपला सूर गवसला

गोव्याच्या इतिहासातील अटीतटीची लढत, भाजपला नेता तर आपला सूर गवसला 

विवेक ताम्हणकर, कोंकण 

गोवा विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यातील काहींना घवघवीत यश मिळाले, तर काही काटावर पास झाले. उर्वरीत उमेदवारांच्या वाट्याला निराशा आली. या निवडणुकीत भाजपला डॉ. प्रमोद सावंत यांच्या रूपाने नेता तर आपला गोव्यात सूर गवसला आहे. दरम्यान नव्या सरकारकडून गोवेकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गोव्यातील खाजगी उद्योग क्षेत्राने सरकारच्या धोरणांमध्ये खाजगी क्षेत्राबद्दलही तरतुदी असाव्या अशी मागणी केली आहे. 

गोव्यात 40 पैकी 9 मतदारसंघात विजेत्या उमेदवाराचे मताधिक्य एक हजारांपेक्षा कमी आहे. राज्यात 20 जागा जिंकलेल्या भाजपचे सहा उमेदवार कमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. फोंडा मतदारसंघात डॉ. केतन भाटीकर यांच्या विरोधात लढणारे रवी नाईक फक्त 77 मतांनी विजयी झाले.

पणजीत भाजपचे बाबुश मोन्सेरात आणि अपक्ष उत्पल पर्रीकर यांच्यात देखील अटीतटीची लढत झाली. बाबुश मोन्सेरात यांनी उत्पल पर्रीकर यांचा 716 मतांनी पराभव केला. मांद्रे मतदारसंघात मगोचे जीत आरोलकर हे 768 मतांनी विजयी झाले. आरजीचे एकमेव आमदार वीरेश बोरकर यांनी सांत आंद्रे मतदारसंघात बाजी मारली. प्रियोळमध्ये मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी गोविंद गावडे यांना चांगली टक्कर दिली. या दोघांमध्ये 213 मतांचा फरक आहे. 

गोव्यात 20 जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत किरकोळ वाढ झाली आहे. यावेळी भाजपने 33.3% मते मिळवली. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्व 40 जागा लढवल्या होत्या. यातील 20 जागा जिंकण्यात त्यांना यश आले. पक्षाला एकूण 3,16,573 मते मिळाली आहेत.

 गोवा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. कारण उमेदवारांची संख्या वाढल्याने मते विभागली. या निवडणुकीत ‘आप’ तसेच रिव्हॉल्युशनरी गोवन्स या नव्या पक्षांच्या आमदारांनी विधानसभेत पाऊल टाकले. गोंय, गोंयकारपण हे विषय घेऊनच आरजीने कार्य केले. त्यामुळेच त्यांना हे यश संपादन करता आले.

पण आरजीमुळे मगो आणि इतर पक्षांचे मताधिक्य घटले. गोव्यात गेली कित्तेक वर्ष आप आपलं बस्थान बसविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अपयशाच्या चवीनंतर आपने दोन आमदार मिळविले आहेत. तीन ठिकाणी आपला चंगली आघाडी आहे. अरविंद केजरीवालांनी या निकालाचे स्वागत करताना म्हटले आहे कि, गोव्यात प्रामाणिक राजकारणाची सुरुवात होते आहे.

दरम्यान मनोहर पर्रिकर यांच्यानंतर गोवा भाजपाचा नेता कोण हा प्रश्न या निवडणुकीत निकाली निघाला. मनोहर पर्रिकर हा गोवा भाजपचा गेले कित्तेक दशकातला चेहरा होता. त्यांच्या निधनानंतर गोव्यात भाजपाची वाताहत होईल असा कयास अनेकांचा होता. मात्र डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात भाजप पहिल्यांदाच गोव्यात लढला आणि २० जागा इतके मोठे यश मिळविले.

त्यामुळे या निवडणुकीने गोवा भाजपाला डॉ प्रमोद सावंत यांच्या रूपाने नेता मिळाला आहे. दरम्यान आता भाजपा अंतर्गत डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचं काम केलं जात आहे. विश्वजित राणे हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत.  


दरम्यान हि निवडणूक भाजपा ज्यांच्या नेतृत्वात लढली ते डॉ. प्रमोद सावंत निवडून आले असले तरीही त्यांना ही निवडणूक सोपी गेली नाही हे निश्चित. मात्र विश्वजीत राणेंनी अगदी सहजपणे विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना 12250 मतं मिळाली असून काँग्रेसच्या धर्मेश सगलानी यांना 11584 मतं मिळाली आहेत. प्रमोद सावंत फक्त 666 मतांच्या फरकाने निवडून आले आहेत.

दुसरीकडे वाळपई मतदारसंघात विश्वजीत राणेंना 14462 मतं मिळाली आहेत, त्यांच्यासमोर रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या मनोज परब यांचं तगडं आव्हान मानलं जात होतं. पण मनोज परब यांना 6377 मतं पडल्याने विश्वजीत राणे 8,085 एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यामुळे राणे यांचं वजन वाढलं आहे. त्यातच राणे यांनी परस्पर राज्यपालांची भेट घेतली आहे.

यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, तसेच चर्चेला उधाण आले आहे. प्रमोद सावंत विधीमंडळ गटनेते असले तरीही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावासाठी विरोध होण्याची शक्यता आहे. प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे.

त्यामुळे विश्वजीत राणे  मुख्यमंत्रीपदासाठी दावा करु शकतात. विश्वजीत राणेंनी असा पवित्रा घेतल्यास मात्र भाजपसमोर मोठा पेच निर्माण होऊ शकतो.


नव्या सरकारकडून गोवेकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गोव्यातील खाजगी उद्योग क्षेत्राने सरकारच्या धोरणांमध्ये खाजगी क्षेत्राबद्दलही तरतुदी असाव्या अशी मागणी केली आहे. उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारला पाहिजे.

सरकारने आपला निर्णायक विजय गोव्याला पुढे नेण्यासाठी वापरण्याची वेळ आली आहे. आता शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. भाजपला दिलेल्या निर्णायक जनादेशामुळे पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी स्थिर सरकारची खात्री झाली पाहिजे. आम्हाला विश्वास आहे की उद्योगाच्या अपेक्षा आणि उद्योगाला दिलेली वचनबद्धता नवीन सरकार पूर्णपणे अंमलात आणेल, असे मत खाजगी क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केले आहे.


या निवडणुकीने गोव्यात बरंच काही नव्याने घडले आहे. प्रस्थापितांना धक्का तर नव्यानं संधी गोवेकरांना दिली. भाजपला मोठे बहुमत दिले. त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेसला सफसेल नाकारले आहे. आगामी काळात गोव्याचे राजकारण कुठवर जातंय हे पाहून महत्वाचा ठरणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment