गर्भपात प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या डॉ. रेखा कदम यांचे पती डॉ. नीरज कदम यास अटक.
वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे एका खासगी रुग्णालयात अनेक अर्भकांच्या कवट्या आणि हाडांचा अक्षरश: ढीग आढळून आला. अल्पवयीन मुलीच्या अवैध गर्भपात प्रकरणाची चौकशी सुरू असताना हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
या घृणास्पद प्रकारामुळे अशा गर्भपात केंद्रांना शासनाची मान्यता कशी, इथपासून तर असे गैरप्रकार थांबवण्यासाठी कारवाईची नेमकी तरतूद काय, पुन्हा एकदा असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या अवैध गर्भपात प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या डॉ. रेखा यांचे पती डॉ. नीरज कदम यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक, पोस्को अंतर्गत आर्वी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे वैद्यकीय गैर कारभारा बद्दल आरोग्य विभागाने अद्याप पोलीस तक्रार न केल्याने, पोलीस अवैध गर्भपात करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करीत आहे.
आर्वीच्या प्रकरणात मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर प्राथमिक चौकशीसाठी डॉ. रे
खा यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र त्या व त्यांच्या सहकाऱ्याची चौकशी केल्यानंतर रुग्णालयात गर्भपात झाल्याचे कळून आल्यावर परिसरात खोदकाम करण्यात आले. तेव्हा कवट्या व हाडे आढळली. पण, हे गर्भपात अवैध आहेत का, केंद्राची मान्यता, डॉक्टरांचे अधिकार काय, या सर्व बाबीची चौकशी करण्याचे आधिकार कायद्यानुसार शासकीय आरोग्य यंत्रणेस आहे.
म्हणून अवैध गर्भपात पक्ररणात जोवर वैद्यकीय अधिकारी अहवाल सादर करून पोलिसांकडे तक्रार दाखल करीत नाही, तोपर्यत पोलिसांचा अन्य बाबतीत अधिकार चालत नाही. आर्वी पोलिसांनी अशी मागणी अधिकृतपणे आरोग्य यंत्रणेकडे केली आहे.
पण, अद्याप अधिकाऱ्यांची तक्रार नसल्याने पोलिसांनी आपला तपास या प्रकरणात अल्पवयीन मुलीकडून आलेल्या तक्रारीवरच म्हणजे लैंगिक शोषण व फसवणुकीवर केंद्रित केला आहे. गर्भपात केंद्र असल्याने मृतावस्थेतील भ्रूण किंवा अर्भकाची विल्हेवाट लावणे आलेच. मात्र त्यासाठी असणारी वैद्यकीय तरतूद पाळली गेली अथवा नाही, हेदेखील आरोग्य अधिकारीच सांगू शकतात. पोलिसांची या प्रकरणात तूर्त ‘थांबा आणि बघा’ अशीच भूमिका आहे.