कलाकारांच्या प्राणीप्रेमाचे अनेक किस्से आपण नेहमी ऐकतो. कितीही तासांचे शूटिंग करून जेव्हा हे कलाकार घरी येतात तेव्हा त्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांसोबत खेळल्यानंतर त्यांचा थकवा कुठच्याकुठे पळून जातो.
सोशल मीडियावर कलाकार त्यांच्या आवडत्या पेटससोबतचे फोटोही शेअर करत असतात. याच पंक्तीत अभिनेता अभिषेक देशमुखही आहे, पण त्याने आपले प्राणीप्रेम फक्त सोशल मीडियावर फोटो काढण्यापुरते किंवा त्याचे घरात लाड करण्यापुरते ठेवलेले नाही तर प्राणी आणि माणूस यांच्यातील नातं अधिक दृढ व्हावं यासाठी त्याने याच सोशल मीडियाचा उपयोग करून यूट्यूब चॅनल सुरू केले आहे.
माय पॉसम फ्रेंड या त्याच्या यूट्यूब चॅनलवर तो अशा लोकांच्या मुलाखती घेत आहे की जे प्राण्यांसोबत काम करतात, त्यांच्या संरक्षणाबाबत जागृती करतात. आहे की नाही भन्नाट उपक्रम.
अभिषेक देशमुखला आपण सध्या आई कुठे काय करते या मालिकेत यशच्या भूमिकेत आपण पाहत आहोत. मधुराणी गोखले, मिलिंद गवळी यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांसोबत अभिषेकने यश या भूमिकेत दिसणारा सध्याचा तरूण परफेक्ट साकारला आहे.
माधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या १५ ऑगस्ट या ऑनलाइन रिलीज झालेल्या सिनेमातही अभिषेक दिसला होता. होम स्वीट होम या सिनेमात त्याने काम केले आहे. पसंत आहे मुलगी या मालिकेतील त्याने साकारलेला पुनर्वसू हा नायकही प्रेक्षकांना आवडला.
अभिषेक अभिनय करताना दिसत असला तरी प्रेक्षक म्हणून किंवा चाहते म्हणून न दिसणाऱ्या गोष्टी त्याच्याकडे खूप आहेत. तो लेखक आणि दिग्दर्शकही आहे. मालिका आणि सिनेमात येण्यापूर्वी काही नाटकं त्याने लिहून दिग्दर्शितही केली आहेत. सध्याच्या लोकप्रिय डिजिटल माध्यमासाठी त्याने वेबसिरीजवरही ऑफस्क्रीन खूप काम केले आहे.
अभिषेकला प्राण्यांची खूप आवड आहे. प्राणीप्रेमासाठी काय करता येईल असा विचार करत असताना त्याला यू ट्यूब चॅनल सुरू करण्याची कल्पना सुचली. कोरोनामुळे तो काम करत असलेल्या मालिकेचे शूटिंग बंद झाले. शिवाय इतरही काही प्रोजेक्ट हातात नव्हतं.
मग याच वेळेचा उपयोग त्याने यूट्यूब चॅनेल सुरू करण्यासाठी करायचे असे ठरवले. अभिषेक सांगतो, यूट्यूबवर प्राण्यांविषयी माहिती देणारी किंवा अनुभव सांगणारी खूप लोक आहेत.
मग माझे वेगळेपण मी कसे ठेवू शकतो यावर बराच विचार केल्यावर मला वाटलं की फक्त माहिती देण्यापेक्षा काही व्हिडिओ बनवावेत. त्यातूनच प्राण्यांसाठी, प्राण्यांसोबत काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती घेण्याचे मी ठरवले.
अभिषेकने या चॅनेलवर पहिली मुलाखत घेतली ती प्रकाश आमटे यांची. हेमलकसामध्ये आमटे हे सतत प्राण्यांच्या सानिध्यात असतात. खारीपासून ते बिबट्यापर्यंत अनेक प्राण्यांशी त्यांचा संवाद आहे.
त्यामुळे अभिषेकच्या या माय पॉसम फ्रेंड चॅनेलचा पडदा उघडण्यासाठी प्रकाश आमटे यांच्याशिवाय दुसरी व्यक्ती योग्य ठरली नसती. अर्थात या मुलाखती ऑनलाइन आहेत.
पहिल्या काही दिवसातच अभिषेकच्या या उपक्रमाला त्याच्या चाहत्यांकडून इतकी दाद मिळाली की आता चॅनेलवर पुढची मुलाखत कुणाची असणार याविषयी उत्सुकता निर्माण करण्यात अभिषेकचं चॅनेल यशस्वी ठरलं आहे. अभिषेकलाही मुळात प्राण्यांची आवड असल्याने हे व्हिडिओ बनवण्यात त्याला खूप मजा येतेय.
अभिषेक हा लेखक असल्याने त्याला सतत काही ना काही लिहिण्यासाठी तर सुचत असतेच पण नव्या पिढीचे माध्यम असलेल्या यू ट्यूबचा वापर करून त्याने प्राण्यांना माणुसकीने वागवा, त्यांच्यावर अन्याय करू नका हा संदेश देण्यासाठी एक आगळंवेगळं पाऊल टाकलं आहे.
प्रत्यक्षात प्राण्यांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींसोबतच संवाद घडवत तो हा संदेश देत आहे.
अभिनयासोबत अशा वेगळया गोष्टी करण्यात रमणाऱ्या अभिषेकची बहिण अमृता ही देखील अभिनेत्री असून स्वीटी सातारकर या सिनेमातील टायटल रोल तिने केला होता.
पानिपत या सिनेमात दिसलेली कृतिका देवसोबत अभिषेकचे लग्न झाले असून दोघेही अभिनयाच्या क्षेत्रात काम करत असल्याने कृतिकाचीही त्याला या चॅनेलसाठी प्राणीप्रेमी कलाकारांशी संवाद घडवून आणायला मदत होते.
अभिषेक मूळचा जळगावचा असून अभिनयातील करिअरसाठी त्याने मुंबईकडे प्रवास केला. कोणतीही गोष्ट साधी सरळ करायला त्याला आवडते. विनाकारण डामडौल करण्यापेक्षा साधेपणा त्याला आवडतो.
त्याच्या प्राणीप्रेमाची पावतीही त्याने एक असं चॅनेल सुरू करून दिली आहे की जिथे शोबाजी नसून खरोखर काम करणाऱ्या प्राणीप्रेमींना जगभरात चॅनेलच्या माध्यमातून पोहोचवले आहे.