१९८८ पासून गेली ३५ वर्षे १४ जानेवारी हा ‘भूगोल दिन’ म्हणनू साजरा केला जातो. विषयानुसार ‘दिन’ पाळण्याची एक परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. उदाहरणार्थ, मराठी दिन (२७ फेब्रुवारी), विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी), संस्कृत दिन (आषाढ प्रथम दिवस) इत्यादी. याचप्रमाणे अत्यंत महत्वाचा पण दुर्लक्षित असा विषय म्हणजे भूगोल.
देशपातळीवरील भूगोल विषयतज्ञ प्रोफेसर सी.डी.देशपांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार १९८६ मध्ये पुणे येथे पंडित भीमसेन जोशी यांच्या हस्ते झाला होता. पुण्यातील पत्रकार, लेखक, डॉक्टर सुरेश गरसोळे यांनी तो घडवून आणला होता. विशेष बाब म्हणजे १४ जानेवारी हा सी.डी. देशपांडे यांचा जन्मदिवस. याच दरम्यान मकरसंक्रांतीचा सण असतो. ऋतू बदल होण्याचा हा दिवस भूगोलात महत्त्वाचा आहे. म्हणून याच दिवशी भूगोल दिन साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे उपक्रम निवडले जातात. व्याख्याने, ध्वनिफिती दाखवून भौगोलिक घटकाचे महत्त्व सांगणे, भौगोलिक सहली, नकाशे व इतर भौगोलिक साहित्याचे प्रदर्शन, इतर विषयांशी असलेला भूगोलाचा सहसंबंध असे अनेक उपक्रम घेतले जा- तात. वर्षातून एकदा तरी या विषयावर लक्ष केंद्रित व्हावे, म्हणून या भूगोल दिनाचे औचित्य साधून अनेक उपक्रम घेतले जातात.
साधारणपणे २२ डिसेंबरपासून पृथ्वीचे उत्तरायण व्हायला सुरुवात होते. हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार १४ जानेवारी पासून दिवसाचा कालावधी हा वाढत जातो. कारण पृथ्वीचा उत्तर ध्रुव हा सूर्याकडे हळहळू झुकण्यास प्रारंभ होत असतो; तो थेट २१ जूनपर्यंत. २१ जूनला पृथ्वीचा उत्तर ध्रुव हा साडेतेवीस अंशाने सूर्याकडे झुकलेला असतो. म्हणून २२ डिसेंबर ते १४ जानेवारी हा काळ महत्त्वाचा ठरतो. याचाच एक भाग म्हणून वेगवेगळ्या शैक्षणिक ठिकाणी भूगोल पंधरवडाही पाळला जातो. काही ठिकाणी भूगोल सप्ताह सुद्धा पाळला जातो. त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात.
भूगोलासंबंधी, पृथ्वीविषयी अधिक जागृत राहून पर्यावरणाचे रक्षण करणे हेच खऱ्या अर्थाने भूगोल दिन साजरा करताना आवश्यक बनलेले आहे. कारण, मानवाने स्वत:ची प्रगती करत असताना पृथ्वी व पर्यावरण यांची अपरिमित प्रमाणात हानी, प्रदूषण केलेले दिसून येते. परंतु यावर आता चिंतन करणे गरजेचे बनलेले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे होणारे वातावरणातील बदल या संदर्भाने आता आपणाला गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यावरती धोरणात्मक उपाय म्हणून आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करूयात. भूगोल दिनाच्या निमित्ताने तरी आपण या दृष्टीने जागृत होऊयात, याच खऱ्या अर्थाने भूगोल दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !