पुणे – बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेल्या अरुण भेलके याला विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी आठ वर्षे सक्तमजुरी आणि ४२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
चाकण परिसरातून २०१४ मध्ये अरुण भेलके उर्फ आदित्य पाटील आणि त्याची पत्नी कांचन उर्फ सोनाली पाटील (वय ३३) यांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली होती. भेलके दाम्पत्य मूळचे चंद्रपूरचे आहे. दोघांच्या विरोधात बेकायदा प्रतिबंधक हालचाल (यूएपीए) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून भेलके येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची पत्नी कांचन हिचा दीर्घ आजाराने ससून रुग्णालयात मृत्यू झाला. कांचनला ह्दयविकाराचा त्रास होता.
पुणे, मुंबई शहरात दोघे जण माओवादी विचारांचा प्रसार करत होते. बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या कामात शहरी भागातील तरुणांना ओढण्याचे काम भेलके दाम्पत्याकडे सोपविण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मुंबईत वास्तव्यास असताना अरुण भेलके एल्गार प्रकरणातील आरोपी सुधीर ढवळे यांच्या रिपब्लिकन पॅंथर्स या संघटनेच्या संपर्कात आला. त्यानंतर अरुण भेलके आणि त्याची पत्नी कांचन यांनी आदित्य पाटील आणि सोनाली पाटील यांनी बनावट नावाने पॅनकार्ड मिळवल्याचे तपासात उघडकीस आले हाेते.
पुणे, मुंबईत माओवादी चळवळीचा प्रसार अरुण भेलके आणि त्याची पत्नी करत होती. झाेपडपट्टीतील तरुणांना या दोघांना माओवादी चळवळीत ओढले होते, असे एटीएसने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले होते. भेलके दाम्पत्याकडून कागदपत्रे, लॅपटॉप, पेनड्राइव्ह असे साहित्य जप्त करण्यात आले होते. तांत्रिक तपासात भेलके माओवादी नेत्यांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले होते.