शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी वरळी कोळीवाडा येथील गोल्फादेवी यात्रेला भेट देत देवीचं दर्शन घेतलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी राज्याचा घसरलेला जीडीपी, गुंतवणुकीवरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. युवा बेरोजगार आहेत. राज्यात राजकीय पातळी घसरत चालली आहे. आता जीडीपी घसरायला केळ्याची साल सहा महिन्यांपूर्वी कुणी टाकली हे लक्षात घ्या,असं म्हणत शिंदे गटावर तोफ डागली.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, आपल्या राज्यात नवीन गुंतवणूक येताना दिसत नाही. राज्यात कोणीही गुंतवणूकदार यायला इच्छुक नाही आहे. राजकीय पातळी घसरत आहे. पण सर्व पक्षांनी एकत्र येऊन राज्याच्या विकासासाठी बोललं पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी पुढे औरंगजेबजी असं म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना शालजोडीत टोला लगावला. काल योगीजी येऊन गेलेले आहेत. मी योगीजी म्हणालो औरंगजेबजी म्हणालो नाही जसे ते बोलतात तसे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. इतर मुख्यमंत्री आपल्या राज्यात येतात आणि त्यांच्या राज्यासाठी काही घेऊन जातात; पण आपले मुख्यमंत्री दिल्लीत जातात आणि स्वतःसाठी घेऊन येतात, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.