क्रीडा

एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२

जपानची उपांत्य फेरीत धडक थायलंडचा7-0 गोलने धुव्वा

नवी मुंबई, दि. ३० :

जपानने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारताना थायलंडचा ७-० गोलने धुव्वा उडवला. डीवाय पाटील स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात जपानने जबरदस्त आक्रमक खेळ करताना थायलंडला कोणतीही संधी दिली नाही.

या शानदार विजयासह दोन वेळच्या विजेत्या आणि गतविजेत्या असलेल्या जपानने २०२३ साली ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंड यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रताही मिळवली.

उपांत्य सामन्यात जपानचा सामना चीन विरुद्ध व्हिएतनाम यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध होईल. दुसरीकडे, १९८३ सालानंतर पहिल्यांदाच महिला आशिया चषक उंचावण्याची थायलंडचे स्वप्न धुळीस मिळाले. मात्र, असे असले तरी प्ले ऑफ सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करुन विश्वचषक स्पधेर्साठी पात्र ठरण्याची संधी त्यांच्याकडे आहे.


कोरोनाचा शिरकाव झाल्याने थायलंडला आपल्या काही खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये जपानविरुद्ध खेळावे लागले. याचा मोठा फटका त्यांना बसला. युइका सुगासवा हिने चार गोल नोंदवत जपानच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. हिनाता मियाझावा, रिन सुमिदा आणि रिको युएकी यांनी प्रत्येकी एक गोल केला.
जपानने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत अल्पावधीतच सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. माना इवाबुचीने दोन वेळा आक्रमण केल्यानंतर १४व्या मिनिटाला जपानला आघाडीवर नेण्याची सुवर्ण संधी गमावली.

पेनल्टी बॉक्समध्ये थायलंडच्या विलैपोर्न बूथडुआंग हिने रिन सुमिदाला पाडून फाऊल केल्याने जपानला पेनल्टी किक बहाल करण्यात आली. यावेळी मानाने मारलेली किक थायलंडची गोलकीपर वारापोर्न बून्सिंगने अचूकपणे रोखत जपानला आघाडी घेण्यापासून दूर ठेवले.


यानंतरही बून्सिंगने अडखळत का होईना, पण जपानचे आक्रमण रोखले आणि २७व्या मिनिटाला तिने जपानला गोल करु दिले नाही. मात्र, २७व्या मिनिटाला युइका सुगासवाने गोलजळ्याच्या बरोबर समोरुन जोरदार किक मारत जपानला १-० गोल असे आघाडीवर नेले. थायलंडने यानंतर कडवा प्रतिकार करत पुन्हा एकदा भक्कम बचाव केला. मात्र मध्यंतराच्या काही सेकंद आधी हिनाता मियाझावानेही गोलजाळ्याच्या जवळून अचूक किक करत जपानची आघाडी २-० गोल अशी भक्कम केली.


दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाल्यानंतर तिसऱ्याच मिनिटाला सुमिदाने जपानचा तिसरा गोल नोंदवत थायलंडच्या स्वप्नांना सुरुंग लावला. तिसरा गोल स्विकाराल्यानंतर थायलंडने काहीसे सावरत असतानाच जपानने मात्र आपला खेळ आणखी वेगवान करताना सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले.


फोनफिरुन फिलावनने सुगासवाला खाली पाडल्याने जपानला आणखी एक पेनल्टी किक मिळाली. या संधीचा फायदा घेत सुगासवा हिने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा गोल केला.


जपानचा वेग झाला नाही. उर्वरीत वेळेत जपानने आणखी ३ गोल केले. रिको युएकीने ७५ व्या मिनिटाला गोल केला. पाच मिनिटांनी सुगासवाने आपली हॅटट्रिक पूर्ण करत संघाचा सहावा गोल केला आणि यानंतर ८३व्या मिनिटाला वैयक्तिक चौथा गोल करत जपानच्या ७-० गोलने दिमाखदार विजयावर शिक्कामोर्तब केले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment