क्रीडा

एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२

चायना पीआरची विक्रमी विजेतेपदाकडे कूच

नवी मुंबई, दि. ३० : बलाढ्य चायना पीआरने आपल्या एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेतील विक्रमी नवव्या विजेतेपदाकडे आगेकूच करताना व्हिएतनामचा ३-१ गोलने पराभव केला. या शानदार विजयासह चायना पीआरने आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारतानाच ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंड यांच्या यजमानपदाखाली २०२३ साली होणाऱ्या फिफा महिला विश्वचषक स्पधेर्तील स्थानही निश्चित केले.


डीवाय पाटील स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात चायना पीआर कडून वाँग शाँग, वाँग शानशान आणि जियाली टँग यांनी प्रत्येकी एक गोल करत चायनाचा विजय साकारला. उपांत्य फेरीत चायना पीआरला आता जपानच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. त्याचवेळी, व्हिएतनाम आता प्ले ऑफ सामन्याद्वारे फिफा विश्वचषक स्पर्धेची पात्रता मिळवण्याचा प्रयत्न करतील.


चायना पीआरने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून दिमाखात बाद फेरीत प्रवेश केला होता. व्हिएतनाम आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याचा इतिहास रचून थेट विश्वचषक स्पर्धेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, त्यांचा चायना पीआरच्या आक्रमकतेपुढे निभाव लागला नाही.

व्हिएतनाम संघाने आक्रमक हूयन न्हू हिला विश्रांती देत फाम है येन आणि एनग्युयेन थी वान यांना आक्रमक म्हणून पसंती दिली. परंतु, हे दोन्ही खेळाडू सामन्यात दबावाखाली दिसले.


सातव्याच मिनिटाला चायना पीआरच्या वाँग शाँगने गोल केला, परंतु रेफ्रींनी ऑफ साइड दिल्याने चायनाचे खाते उघडले नाही. दोन मिनिटांनी चायना पीआरच्या टँग जियालीने मारलेल्या हेडरवर चेंडू बारला लागला. चायना पीआरच्या आक्रमक खेळीनंतरही व्हिएतनामने लवकरच स्वत:ला सावरले आणि ११ व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल करत १-० अशी धक्कादायक आघाडी घेतली.

चायना पीआरच्या यांग लिनाच्या खराब बचावाचा फायदा घेत एनग्युयेन् थी डंगने चेंडूवर पूर्ण नियंत्रण मारत चायना पीआरची गोलकीपर यू झू हिला चकवले.

या अनपेक्षित गोलने चवताळलेल्या चायना पीआरने आक्रमक प्रत्युत्तर दिले. स्पर्धेतील पहिला गोल स्विकारलेल्या चायना पीआरने यानंतर जोरदार खेळ करताना सामन्याचे चित्र स्पष्ट केले. तरीही वाँग शाँग, जियाली आणि वाँग झियाओक्सू यांनी केलेल्या आक्रमणावर चायना पीआरला यश मिळाले नाही.

अखेर २५व्या मिनीटाला वाँग शाँगने संघाला बरोबरी साधून देत शानदार गोल केला. यानंतर दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ करत मध्यंतराला १-१ गोल अशी बरोबरी कायम राखली.


दुसऱ्या सत्रात मात्र चायना पीआरने जबरदस्त खेळ करताना भन्नाट आक्रमण केले. ५२व्या मिनिटाला वाँग शानशानने चायना पीआरला आघाडी मिळवून देताना संघाचा दुसरा गोल केला. कर्णधार वाँग शाँगने दिलेल्या पासवर चेंडूला अचूकपणे गोलजाळ्याची दिशा देत शानशानने शानदार गोल केला.

पुढच्याच मिनिटाला टँगने व्हिएतनामच्या बचावफळीची कमजोरी हेरली आणि तिने व्हिएतनामच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत चायना पीआरचा तिसरा गोल केला. यासह चायना पीआरने सामन्याचे चित्र स्पष्ट करताना ३-१ गोलने विजय निश्चित केला.


८८व्या मिनिटाला व्हिएतनामला पेनल्टी किक मिळाली. ली मेनग्वेनच्या हाताला चेंडू लागल्याने व्हिएतनामला पेनल्टीद्वारे काही प्रमाणात पुनरागमन करण्याची चांगली संधी मिळाली. पण एनग्युयेन थी बिच थ्यूने मारलेल्या किकवर गोल होऊ शकला नाही आणि चायना पीआरचा विजय स्पष्ट झाला.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment