क्रीडा

कोरिया रिपब्लिकची अंतिम फेरीत धडक एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२

कोरिया रिपब्लिकची अंतिम फेरीत धडक

पुणे , दि. ३ : फिलिपाईन्सचे कडवे आव्हान २-० गोलने परतवून लावत कोरिया रिपब्लिकने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झालेल्या या उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्याच सत्रात दोन गोल करत कोरिया रिपब्लिकने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

विशेष म्हणजे कोरिया रिपब्लिकने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. चो सो-ह्यून आणि सोन हवा-येओन यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाचा विजय साकारला.

फिलिपाईन्सचा पराभव झाला असला, तरी त्यांची कामगिरी प्रभावित करणारी ठरली. स्पर्धेच्या इतिहासामध्ये फिलिपाईन्सने पहिल्यांदाच उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते. या कामगिरीच्या जोरावर त्यांना ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी होण्याची संधी मिळू शकते.

विजयाच्या निधार्रानेच मैदानात उतरलेल्या कोरिया रिपब्लिकने वेळ वाया न घालवता फिलिपाईन्सच्या गोलक्षेत्रात आक्रमण केले आणि चौथ्याच मिनिटाला पहिला गोल केला. सामनावीर ठरलेली चो हिने किम ह्ये-रीच्या कॉर्नर किकवर अप्रतिम हेडर मारला आणि चेंडू फिलिपाईन्सची गोलकीपर ऑलिवा मॅकडेनियलला चकवून गोलजाळ्यात गेला.

यानंतर पहिल्याच उपांत्य सामन्यात खेळत असलेल्या फिलिपाईन्सच्या खेळाडूंचा उत्साहही दिसून आला. सहा मिनिटांनीच सोफिया हॅरिसनने गोल करण्याची संधी निर्माण केली, पण तिला यश आले नाही.
कोरिया रिपब्लिकनेही आक्रमक खेळ कायम राखत सामन्यावरील पकड सोडू दिली नाही.

सोन येओनने १५व्या आणि १९व्या मिनीटाला फिलिपाईन्सच्या गोलजाळ्यावर आक्रमण केले, परंतु गोलकीपर मॅकडेनियलने अप्रतिम बचाव करत कोरिया रिपब्लिकला गोल करण्यापासून रोखले.

फिलिपाईन्सनेही यानंतर जोरदार प्रत्युत्तर देताना कोरिया रिपब्लिकवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. कतरिना गिलोउने २४व्या मिनिटाला दूरुन मारलेल्या वेगवान किकवर चेंडू अवघ्या काही इंचने गोलजाळ्याच्या बाहेरुन गेला.


कोरिया रिपब्लिकने यानंतर आपला वेग अधिक वाढवला. ३४व्या मिनिटाला कोरिया रिपब्लिकने अखेर आपली आघाडी दुप्पट केलीच. चो ह्यो-जूच्या क्रॉसवर सोनने चेंडूचा अचूक अंदाज घेत शानदार गोल केला.
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला फिलिपाईन्सचे मुख्य प्रशिक्षक लेन स्टेजसीक यांनी मालीआ ल्युसी सीझर, चँडलर मॅकडेनियल आणि सारा कास्टानेडा यांना मैदानावर उतरवले.

मात्र, याचा फारसा परिणाम जाणवला नाही. दुसऱ्या सत्रातही कोरिया रिपब्लिकची गोलकीपर किम जुंग-मी हिला क्वचितच आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. त्याचवेळी फिलिपाईन्सने भक्कम बचावाचे प्रदर्शन केल्याने कोरिया रिपब्लिकला तिसरा गोल करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली, पण त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही.

६७व्या मिनिटाला गोल करण्याची मिळालेली सुवर्ण संधी कोरिया रिपब्लिकच्या सोनला साधता आली नाही. यानंतर कोरिया रिपब्लिकने सातत्याने फिलिपाईन्सच्या गोलपोस्टवर आक्रमण केले, मात्र त्यांना यश आले नाही.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment