चेट्टाबटची गोलची हॅटट्रिक; थायलंड विजयी इंडोनेशियाचे आव्हान संपुष्टात
नवी मुंबई २४ जानेवारी २०२२: सलामीच्या लढतीतील पराभवानंतर जोरदार मुसंडी मारताना थायलंडने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेत आज झालेल्या ब गटातील सामन्यात इंडोनेशियाचा ४-० गोलने सहज पराभव केला. येथील डी वाय पाटिल मैदानावर हा सामना झाला.
कान्यानत चेट्टाबट हिने शानदर हॅटट्रिकची नोंद करत विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या सामन्यात त्यांना फिलिपाईन्सकडून ०-१ गोलने पराभव पत्करावा लागला होता. आपली आगेकूच कायम राखण्यासाठी त्यांना आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. या पराभवाने इंडोनेशियाचे स्पधेर्तील आव्हान संपले आहे. थायलंडसमोर आता साखळीतील अखेरच्या लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.
पहिल्या पराभवानंतर थायलंडच्या खेळाडू प्रेरित झाल्या होत्या. त्यांची देहबोली कमालीची आक्रमक होती. त्यांच्या खेळात आत्मविश्वास जाणवत होता. सामन्याच्या सुरवातीलाच सहा यार्डावरून गोल करण्याचे चेट्टाबट हिचे प्रयत्न फोल ठरले. यानंतरही थायलंडने आपला वेगवान खेळ कायम राखला.
त्यांच्या तानिकर्न डांगडा आणि चेट्टाबट दोघींना पूर्वार्धात गोल करण्याच्या चांगल्या संधी निर्माण झाल्या होत्या. थायलंड खेळाडूंच्या सातत्याच्या आक्रमणामुळे इंडोनेशियाचे खेळाडू गोंधळून गेले होते.
इंडोनेशियाची गोलरक्षक फानी सुप्रियांतो हिच्यावरील जबाबदारी त्यामुळे अधिक वाढली होती. डांगडा आणि चेट्टाबट यांच्या आक्रमणात ती एखाद्या भक्कम भिंतीसारखी उभी होती. त्यापूर्वी सामन्याच्या १९व्या मिनिटाला इर्रावदी माक्रीस हिची किक अडवताना फानी हिने आपली चुणूक दाखवून दिली होती.
थायलंडच्या या प्रयत्नांना अखेरीस २७व्या मिनिटाला यश आले. गोलकक्षात असणाऱ्या चेट्टाबट हिच्याकडे इंडोनेशियाच्या बचावफळीचे दुर्लक्ष झाले आणि तिने जारुवान चैयार्क हिच्या पेनल्टी किकवर अगदी जवळून सुरेख हेडर करत थायलंडचे खाते उघडले. थायलंडा दुसरा गोल ३६व्या मिनिटाला झाला.
या वेळी डांगडा हिची चाल चेट्टाबट हिने पूर्णत्वाला नेली. विश्रांतीनंतर खेळाला सुरवात झाल्यानंतरही थायलंडच्या आक्रमणाची धार कुठेही कमी झाली नव्हती. सामन्याच्या ५२व्या मिनिटाला विलापॉर्न बूथडुआंग हिने सुरेख जागा निर्माण करताना डांगडाला पास दिला होता. मात्र, या वेळी ती सुप्रियांतोला चकवू शकली नाही.
इंडोनेशियाची सारी मदर आज गोलरक्षक सुप्रियांतो हिच्यावर राहिली होती. पण, एका टप्प्यावर ती जखमी झाली आणि तिला मैदान सोडावे लागले. तिची जागा रिस्का अप्रिलिआ हिने घेतली.
याचा फायदा घेत चेट्टाबट हिने ७१व्या मिनिटाला जाळीचा वेध घेत संघाचा तिसरा गोल केला आणि आपली हॅटट्रिकही पूर्ण केली. त्यानंतर पाचच मिनिटांनी इर्रावदी माक्रिस हिने मारलेली जोरकस किक अडविण्यासाठी झेप घेऊनहाी अप्रिलिआ हिला चेंडू पर्यंत पोचता आले नाही.