गडचिरोली – महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली असल्याचा गंभीर मुद्दा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज सभागृहाच्या निदर्शनास आणून देतानाच तात्काळ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
अधिवेशनाच्या तोंडावर नक्षलवाद्यांनी अहेरी विधानसभेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह प्रशासनाला एका प्रसिद्धी पत्रकातून धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. सदर गंभीर मुद्दा आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सभागृहासमोर आणून दिला. गडचिरोली हा आदिवासी बहुल जिल्हा असून सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्प सुरू असल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नक्षल यांच्यामध्ये वाद उफाळून आला असून त्यांना तात्काळ सुरक्षा द्यावी. केवळ लोकप्रतिनिधीच नव्हेतर प्रशासनालाही सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी अजित पवार यांनी केली.