सिंधुदुर्ग – राज्य शासनात विलानीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरू आहे.
शासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आता आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी मालवण आगारीतील एसटी कर्मचाऱ्यांनी नायब तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मालवणचे नायब तहसीलदार जी. एम. कोकरे यांना एसटी कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी एसटी कर्मचारी काका खोत, हेमंत तळवडकेकर, दीपक ढोलम व अन्य कर्मचारी उपस्थित होते. या निवेदन पत्रावर मालवण आगारातील सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.
मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात असेही म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचारी यांच्या प्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदानिहाय वेतनश्रेणी देऊन आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे. आम्हा एसटी कर्मचारी यांना जीवदान द्यावे. अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी. अशी मागणी कर्मचाऱ्यांनी निवेदन पत्रातून केली आहे.