Uncategorized

अंबरनाथ तालुक्यात सशस्त्र दरोडा

अंबरनाथ – तालुक्यात ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा घालण्यात आल्याची घटना घडलीये. द्वारली गावातील भाग्यलक्ष्मी ज्वेलर्समध्ये घडलेली ही दरोड्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीये.

अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात कल्याण मलंगगड रोडवर भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स आहे. आज सकाळी ११ च्या सुमारास ज्वेलर्सचे मालक कुमावत आणि दोन कर्मचारी दुकानात बसलेले असताना चार सशस्त्र दरोडेखोर या दुकानात घुसले आणि त्यांनी ज्वेलर्स कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. तर एका दरोडेखोराने ज्वेलर्स मालक कुमावत यांना बंदुकीचा धाक दाखवत सोनं लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्वेलर्समधील दोन्ही कर्मचाऱ्यांनी या दरोडेखोरांचा धाडसी प्रतिकार करत त्यांना दुकानाच्या बाहेर ढकललं. जाता जाता एका दरोडेखोराने काउंटरवर असलेले काही दागिने चोरले. यानंतर इको गाडीतून या दरोडेखोरांनी नेवाळी नाक्याच्या दिशेनं पळ काढला. या झटापटीत दरोडेखोरांच्या पिस्तूलाच्या बॅरेलची स्लाईड तिथेच पडली. ही संपूर्ण झटापट ज्वेलर्सच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्यासह उल्हासनगर विभागातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. तर गुन्हे शाखेच्या टीमनेही घटनास्थळी येत समांतर तपासाला सुरुवात केली. या घटनेत जखमी झालेल्या ज्वेलर्स कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून दरोडेखोरांच्या शोधासाठी ३ टीम रवाना करण्यात आल्याची माहिती उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली आहे. दरम्यान मलंगगड रोडसारख्या गजबजलेल्या रस्त्यावर ही सशस्त्र दरोड्याची घटना घडल्यानं खळबळ माजली आहे. आता या दरोडेखोरांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment