विज्ञान

पाचगणीत दुर्मिळ शेकरूंच्या संख्येत वाढ

सातारा प्रतिनिधी

एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, फळांच्या शोधात धावणाऱ्या व अगदी दुर्मिळरित्या दृष्टीस पडणाऱ्या शेकरूंचे होणारे नित्याचे दर्शन व ‘माणसाळलेले स्वरूप’ पाहून प्राणी व निसर्गप्रेमींना एक न्यारी मेजवानी मिळत आहे. शेकरूंच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, निरीक्षण करून स्वतंत्र अभयारण्याची उभारणी करून पर्यटनाची न्यारी मेजवानी देता येईल का? याकडे वन खात्याने लक्ष केंद्रित करण्याची निसर्ग अन् प्राणीप्रेमींची मागणी होत आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या व थंड हवेच्या या ठिकाणाने मनुष्याला जणू मनसोक्त आनंद देण्याचे व्रतच स्वीकारल्याने पर्यटक पाहुण्यांची येथे रेलचेल नेहमीच सुरू असते. घनदाट जंगलात वन्यप्राण्यांच्या वास्तव्यास मुबलक परिसर उपलब्ध असला तरी अलीकडच्या काळात रानगवे, रानडुकरे, मोर, काळवीट यांचा सर्रास वावर मानवी वस्तीत वाढला आहे. या भागात पूर्वी दृष्टीस पडणाऱ्या वानरांच्या संख्येला बाजूला करून लाल तोंडाच्या माकडांची मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून, पूर्वी जादूचे प्रयोग करण्यासाठी येणाऱ्या मदाऱ्यांकडेच दिसणारी माकडे लवाजम्यात आता विविध प्रेक्षणीय स्थळांवर, तसेच रहदारीच्या ठिकाणी आढळून येत आहेत.


तालुक्याच्या पश्चिम भागात मोठय़ा प्रमाणात वावर असलेल्या मात्र या परिसरात दुर्मिळरित्या दृष्टीस पडणाऱ्या व रानआंबा, अंबाडा, किंजळ, रानबिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, चांदाडा, उंबर, जांभूळ या झाडांवर राहून त्याच झाडांच्या फळांचा शोधात असलेल्या शेकरूंचा या भागातील वावर कुतूहलाचा विषय ठरला असताना अलीकडच्या कालावधीत खारुताईच्या रुपातील दिसायला मोठी व तांबूस रंगांच्या शेकरूंचा वावर मोठय़ा संख्येने शहराच्या विविध ठिकाणी होऊ लागल्याचे प्राणी व निसर्गप्रेमी सांगतात.

सरसर झाडावर, झरझर खाली, चपळाईने या फांदीवरून दुसऱया फांदीवर धावणाऱ्या, झुपकेदार शेपटी, टूकू टूकू बघत मान हलवित व ज्याला महाराष्ट्र राज्याने ‘राज्यप्राणी’ म्हणून मान्यता दिलेला व अगदी मनुष्याच्या आवाजाने व सावलीला घाबरणारा ‘हा’ पाहुणा चक्क काही महिन्यांपूर्वी लाखात एक अशा प्रमाणात आढळणाऱ्या पांढऱ्या शेकरूचा वावर गुरेघर (ता. महाबळेश्वर) येथे दृष्टीस पडल्याने त्याचे येथील अस्तित्व स्पष्ट झाले आहे तर शहरी भागातील खारुताईप्रमाणे या प्राण्यांच्या संख्येतसुद्धा वाढ होत आहे का?

याकडे वनखात्याने त्याच्यावर लक्ष केंद्रित करून, निरीक्षण करून भविष्यात भीमाशंकरसारखे स्वतंत्र अभयारण्य उभारून पर्यटकांना एक न्यारी मेजवानी देता येईल का? याविषयी पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी प्राणीप्रेमी व्यक्त करत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment