महाराष्ट्र

अनाथांची माय माझी सिंधुताई सपकाळ

अनाथांची माय माझी सिंधुताई सपकाळ
पद्मश्री सिंधुताई सपकाळ विदर्भाच्या कुशीत, विदर्भाच्या मुशीत घडलेलं नाव. या मातीने या लेकीचा जन्म पाहिला, जीवन पाहिले आणि आता त्यांचा मृत्यूही…


माई सांगायच्या, घराबाहेर पडलेल्या स्त्रीचा लोक सत्कार करीत नाही बलात्कारच करतात. या भितीपोटी घराबाहेर पडल्यावर स्मशानात आश्रय घेतला. चितेच्या निखारयावर भाकर भाजली… पुढे त्याच निखारयांनी त्यांच आयुष्य उजळलं.


नकळत्या वयातील विवाह, कोवळ्या गर्भातून लागोलाग मुलं होण, मुलांना वाढवतांना त्यांच्या गरजा पुर्ण करतांनाची होणारी ससेहोलपट…पन्नास ते साठच्या दशकातील भारतीय आयांची ही अशीच कहाणी. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे जन्मलेल्या सिंधुताईंच्या जीवनीही अशीच.

सिंधुताईंना शिक्षणाची आवड होती पण त्यांच्या शिकण्याला त्यांच्या आईचा विरोध होता.
सिंधुताई आपल्या वनवासी या आत्मकथनात सांगतात, “आई मला म्हशींना राखायला पाठवयाची. म्हशी पाण्यात बसल्या की मी शाळेत जायचे. म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसायच्या. एकदा शाळेत उशिरा गेल्याने मास्तरांनी मारलं. शेतकरी शाळेत आला आणि म्हणाला- म्हशींनी माझं शेत खाल्लं. तेव्हा मास्तरांना कळलं की म्हशी पाण्यात बसल्या की मी शाळेत येते.

हे समजल्यावर मास्तर कळवळले… मी आईचा विरोध असतांना बंड करून शाळेत जाते, हे लक्षात येताच तिने माझं लग्न ठरवलं. लग्नात माझं वय दहा होतं. नवरा 35 वर्षांचा होता. दुर्देव असं की माझ्या पतीला माझ्या हातात असलेला कागद सहन होत नसे. ते शिकलेले नव्हते. ते पती असून त्यांना वाचता येत नाही आणि मी पत्नी असूनही मला वाचता यायचं याचा त्यांना प्रचंड राग होता. माझ्या हातात कागद दिसला की ते मारहाण करायचे.”
एवढा छळ सोसुनही त्यांनी त्यांच वाचन सुरु ठेवलं होतं त्या सांगत, “मी चोरून-चोरून कागद वाचायचे. कारण घरचे लोक लावालावी करायचे. माझ्या पतीला सांगायचे, की तुझी बायको काम करत नाही, कामचुकारपणा करते. कागद दिसला की घरचे तक्रार करायचे. अन कुठले कागद नी कुठली पुस्तकं? त्यावेळी वाणसामानाचे कागद हे माझे धर्मग्रंथ होते. …

वाचायला एखाद कागद सापडला की मी तो उंदराच्या बिळात लपवून ठेवायचे. उंदीर मी ठेवलेले कागद बिळाच्या आत लोटायचे. इतके की हाती नाही लागायचे. मग एक दिवस मोठं उंदराचं बिळ पाहिलं. अपनी देना बँक बढ गयी असं वाटलं. त्या मोठ्या बिळात कागद ठेवले. ते बिळ उंदराचं नव्हतं, मुंगुंसाचं होतं. एक दिवस त्या बिळात एक कागद टाकला त्यावर गदिमांची कविता होती. पाण्याला जाताना कागद वाचू असं डोक्यात होतं.

घरी शक्य नव्हतं. मी मुंगसाच्या बिळात हात घातला. माझा हात त्यांना सापासारखा वाटला… मुंगसाने डंख दिला, आगजाळ झोंबलं. त्याने माझी करंगळी सोडली नाही, मी माझा कागद सोडला नाही. कागदासकट मुंगूस बाहेर काढला. मी वाचनाची भुकेलेली होती. रक्ताची धार त्या कवितेवर गळत होती. मी रक्ताचं अर्घ्य देऊन वाचलं होतं. म्हणून मला हे कधी विसरता आलं नाही.


असा वैरी संसार करीत असतांना एकदा त्यांनी शेण काढणाऱ्या महिलांना मजुरी मिळत नसल्याबद्दल आवाज उठविला. त्या सांगत असे, आम्ही शेण काढायचो, पण त्याची आम्हाला मजुरी मिळायची नाही, आम्ही गोळा केलेलं शेण फॉरेस्टवाले घेऊन जायचे. त्यावेळी रंगनाथन कलेक्टर होते मी त्यांना, आम्हा बायकांच म्हणन पटवून दिलं. नवऱ्याने दिवसभर गाई वळायच्या, आम्ही शेण काढायचं असं होतं. नवऱ्याचं पीठ तर बायकोचं तेलमीठ नको का? आम्हाला शेण काढायची मजुरी द्या? अस पटवून .

माझा विजय झाला. पण चांगलं करताना वाईटही होतं…
त्यावेळी सिंधुताई गर्भार होत्या. गावात शेणाची दलाली करणारयाने त्याच नुकसान करणारया सिंधुताईवर सुड उगवला. सिंधुताईंबाबत अफवा पसरवली की तिच्या पोटात असलेलं बाळ त्याच आहे. मग काय..? कुठलिही शाहानिशा न करता त्यांना त्या अवस्थेतून अगदी दगड मारून घराबाहेर काढण्यात आलं.

भरल्या दिवसाच्या शिंधुताई गाईच्या गोठ्याचा आश्रय घेतला. तिथे त्यांनी मुलीला जन्म दिला. दहा दिवस तिथेच राहील्या. त्यावेळी त्या वीस वर्षाच्या होत्या. पुढे आपल्या दहा दिवसाच्या मुलीला घेऊन त्या आश्रयासाठी गावात, नात्यागोत्यातल्या दाराशी फिरत राहील्या. सख्ख्या आईनेही त्यांना आश्रय देण्याचे नाकारले. तिथून सिंधुताई सपकाळांना घडवणारया संघर्षाची सुरवात झाली.


रेल्वेत गाण म्हटलं की लोक काहीतरी देत. मग दिवसभर मिळालेलं अन्न गोळा करुन, रात्री स्टेशनवरील अनाथ मुलांना खाऊ घालत. त्यांची माय होत. अनाथांची माय होण्याची प्रेरणा त्यांना या मुलाच्या भुकेतून मिळाली. आज त्या अश्या कितीतरी मुलांच्या माय-बाप आहेत. त्यांच्या आश्रमातील मुल आपल्या नावानंतर सिंधुताई सपकाळ असे नाव लावतात. ही गौरवाची बाब आहे.

सिंधुताईना त्यांच्या कार्यासाठी ७५० राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.


बाल निकेतन हडपसर पुणे, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा, अभिमान बाल भवन वर्धा, गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा (गोपालन) या संस्थेच्या माध्यमातून आजही त्या अखेर पर्यंत कार्यरत होत्या. त्यांच्या स्फुर्तीदायी स्मरणास महाराष्ट्र माझातर्फ़े विनम्र अभिवादन.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment