मनोरंजन

आणि या अभिनेत्रीच्या रूपाने मराठी सिनेमाला मिळाला ग्लॅमरस चेहरा

सई ताम्हणकर, वैदेही परशुरामी, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर या आजच्या आधुनिक आणि शहरी ढंगातल्या मराठी सिनेमांच्या नायिका म्हणून मिरवत आहेत. पण जेव्हा मराठी सिनेमाने ग्रामीण बाज मागे टाकत सिनेमाच्या नायिकेला शहरात आणले, श्रीमंत बापाची लाडावलेली लेक हा ट्रेंड मराठी स्क्रिनवर आणला. कॉलेजमध्ये फुलणारं गुलाबी प्रेम ही मराठी सिनेमाची कथा बनली.

 मिडी, मिनीस्कर्ट, मॅक्सी, सस्पेंडरसूट अशा मॉडर्न ड्रेसमध्ये दिसणारी, घाटात भरधाव कार चालवणारी नायिका मराठी सिनेमात आणण्याचा बदल कोठारे, पिळगावकर कंपनीने केला तो काळ होता 90 च्या दशकाचा.

 आणि याच उंबरठय़ावर मी आले….निघाले… सजले, फुलले, फुलपाखरू झाले असं म्हणत या अभिनेत्रीने मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. वर्षा उसगावकर या गोव्यातल्या कोकणी मुलीने अभिनयातील करिअरसाठी गोवा ते मुंबई व्हाया औरंगाबाद असा प्रवास करत गेली 36 वर्षे अभिनय कारकीर्द घडवली आहे.

याच अभिनेत्रीच्या रूपाने मराठी सिनेमाला ग्लॅमरस चेहरा मिळाला. मराठी सिनेमा कथा व मांडणीच्या निमित्ताने कात टाकत असताना वर्षा उसगावकरने मराठी सिनेमाला मॉडर्न लूक देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नुकताच वर्षा उसगावकरने .

55 वाढदिवस साजरा केला. 55 व्या वर्षीही वर्षाने मेंटेन केलेला फिटनेस, समाजकार्यातील सहभाग, सोशलमीडियावर अ‍ॅक्टीव्ह राहण्याचे कौशल्य लाजवाब आहे.

खरंतर वर्षाच्या गोव्यातल्या घरी तिच्या वडीलांकडे राजकीय क्षेत्रातील लोकांचा राबता होता. गोवा सरकारमध्ये तिचे वडील मंत्री असल्याने राजकारणाच्या गप्पा तिच्या कानावर लहानपणापासून पडायच्या.

 पण वर्षाला मात्र अभिनयाची आवड होती. पुण्यात अभिनयाचे धडे गिरवण्याचे स्वप्न तिने घरी बोलून दाखवले पण आधी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला तिला आईवडीलांनी दिला. पदवीनंतर मात्र तिने अभिनय शिक्षणासाठी औरंगाबाद गाठले आणि तिथून मुंबईची वाट धरली.

दरम्यान दामू केंकरे हे तिच्या वडीलांचे मित्र असल्याने त्यांच्यामुळे कार्टी प्रेमात पडली या नाटकात वर्षाची वर्णी लागली. या नाटकामुळे वर्षासाठी अभिनयाचा पडदा खुला झाला. त्यानंतर प्रशांत दामले सोबत आचार्य अत्रे लिखित ब्रम्हचारी नाटकासाठी तिची निवड झाली.

एकतर हे नाटक खूप गाजले आणि हे नाटक पहायला आलेल्या दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या गंमतजंमत या सिनेमासाठी नायिकेचा शोध वर्षाजवळ येऊन थांबला. 1987 ला गंमतजंमत या सिनेमातून वर्षाने मोठय़ा पडदय़ावर पदार्पण केले.

अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांनी हा काळ गाजवला यामध्ये नायिका म्हणून वर्षाची जोडी या चौघांसोबत अनेक सिनेमांमध्ये गाजली.

 बहुतांशी बेधडक नायिका या रूपात वर्षाने अभिनयातून मराठी सिनेमातून सतत दबलेली, सोशिक नायिकेचा ट्रेंड बदलून टाकला. मुक्तपणे वावरणारी नायिका वर्षाने मराठी सिनेमाला दिली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.

हमाल दे धमाल, सगळीकडे बोबाबोब, सवत माझी लाडकी, पैज लग्नाची, एक होता विदूषक हे तिचे काही गाजलेले सिनेमे. मराठी सिनेमाचा आलेख चढता ठेवत वर्षाने इन्सानियत या सिनेमातून हिंदीतही प्रवेश केला. तिरंगा, दूध का कर्ज, मंगल पांडे यासह अनेक सिनेमात वर्षाच्या रूपाने मराठी चेहरा स्थिरावल्याचे दिसले. महाभारत मालिकेतील उत्तरा ही भूमिका तिने लिलया पेलली.

झांशीची राणी या मालिकेतील झांशीच्या राणीच्या भूमिकेने तिच्या अभिनयाची उंची वाढली. तर च्ंद्रकांता मालिकेतील रूपमती या भूमिकेलाही वर्षाने पुरपूर न्याय दिला. तिच्या बिनधास्तपणामुळे हिंदी सिनेमासृष्टीत वर्षाला वंडरगर्ल म्हणून ओळखले जायचे. दुनियादारी या सिनेमातील तिची राणीमा भाव खाऊन गेली.

मध्यंतरी एक तप वर्षा अभिनयापासून लांबच होती. मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून सक्रिय होती मात्र ऑनस्क्रिन विश्रांती घेतली. संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचा मुलगा अजय शर्मासोबत 22 वर्षापूर्वी लग्न करून संसारात रमली.

दहा वर्षांनी वर्षा जुना मित्र व सहकारी महेश कोठारे निर्मित सुख म्हणजे काय असतं या मालिकेत आली आणि तिच्या चाहत्यांसाठी ही ट्रीटच होती. नंदिनी शिर्के या भूमिकेत सध्या वर्षा दिसत आहे. तर 36 वर्षांनी पुन्हा एकदा वर्षा नाटकातून रंगभूमीवर येणार आहे.

सारख्ं काहीतरी होतय या नाटकात ती प्रशांत दामलेसोबत पुन्हा 36 वर्षांनी रंगमंचावर अभिनय करणार आहे.

वय ही एक संख्या आहे या वाक्याची प्रचिती देणारया वर्षा उसगावकरने 55 वा वाढदिवसही अगदी तारूण्यातील उत्साहानेच साजरा केला.

ANURADHA  KADAM

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment