कोंकण मनोरंजन

आणि या तरुणापासून सुरू झाली कोकणातील चित्रपट निर्मितीची चळवळ !

विवेक ताम्हणकर, कोंकण

कोकण म्हणजे मुंबईकरांच्या मनीऑर्डरवर जगणाऱ्या माणसांचा प्रदेश. कोकण म्हणजे खिशात कोकम आणि मिशीला तूप लावून फिरणाऱ्या माणसांचा प्रदेश. कोकण म्हणजे कशाचीही चिंता नाही.

आजचा दिवस गेला ना उद्याचे कोणाला माहित दिवस उजाडल्यावर पाहू असे म्हणत मेहनतीचे काम नको म्हणून किरकोळ नोकरीसाठी मुंबईचा रस्ता धरणाऱ्या तरुणांचा देश हि ओळख आता येथील तरुण बदलू पाहताहेत. नव्या क्षितीजाच्या वाटा येथील काही तरुणांनी पायदळी तुडवायला सुरवात केलीय.

अशाच एका तरुणाची आज मी आपल्याला ओळख करून देणार आहे. कणकवली हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचा गाव, या गावाला लागूनच कलमठ गाव आहे. येथे राहणाऱ्या शशिकांत कांबळी अर्थात टिकू कांबळी या नावाने सर्व परिचित असलेल्या या तरुणाने मायावी नगरीतील चित्रपट निर्मितीचे क्षेत्र इथेच खेचून आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

किंबहुना या तरुणाने आतापर्यंत पूर्ण लांबीचा १ चित्रपट आणि तोही मालवणी भाषेत, १८ लघुपट ज्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली, १० माहितीपट बनविले आहेत. यामुळे चित्रपट निर्मिती क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींची ओळख येथील नव तरुणांना होऊ लागली आहे.

चित्रपट म्हणजे कोकणी माणसाला काही नवीन नाही. येथील अनेक माणसे मुंबईत गेली त्यांनी नाटकात काम करायला सुरवात केली. काहींनी चित्रपटापर्यंत मजल मारली.

काहीजण पुढे चित्रपट निर्मितीत उतरले. या क्षेत्रातील विविध अंग हाताळू लागले. मात्र मायानगरीतून बाहेर पडून हे नवं माध्यम आपल्या गावात आणण्याचा कोणी प्रयत्न केला नाही.

मात्र शशिकांत कांबळी याने या अनोख्या क्षेत्राला आत्मसात करून प्राप्त परिस्थितीत उपलब्ध साधनांद्वारे या क्षेत्राला या भूमीची गोडी देण्याचा प्रयत्न केला आहे.

“द ग्रेट माथाडी अण्णासाहेब पाटील” या चित्रपटात भूमिका करत असताना येथील विविध माध्यम पाहता आली. चित्रपटाचा कॅमेरा, दिग्दर्शक, मेकअप, लाईट अशा विविध बाबी येथे पाहता आल्या.

यापैकी काही माध्यम जी आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतात ती घेऊन हाताळून पाहूया अशी एक कल्पना मनात येऊन गेली आणि इथेच या क्षेत्रात काहीतरी करण्याची ओढ निर्माण झाली.

एकांकिकेत काम करता करता अभिनयातून लोकांसमोर येण्याचा हेतू होता, मात्र या चित्रपटामुळे मी या क्षेत्राच्या वेगळ्या अंगांकडे ओढला गेलो असे  शशिकांत कांबळी सांगतात.

konk

कांबळी यांनी चक्क मालवणी भाषेतला पूर्ण लांबीचा “भिकू” चित्रपट बनवला आणि आपल्याकडे चित्रपट निर्मिती होऊ शकते याची ओळख कोकणवासीयांना झाली. याबाबत कांबळी म्हणतात या बाबतीत थोडं मागे जावे लागेल.

माजी आमदार प्रमोद जठार यांनी कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे एफटीआयआय च्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी “मुक्ती” हा लघुपट बनविण्यात आला. पुढे तो इफी या गोवा येथे भरणाऱ्या फिल्म फेस्टिवल मध्ये झळकला.  

या शिबिरात सहभागी होताना या लघुपटात काम करण्याची संधी मिळाली. यांनतर या क्षेत्राबाबतचा आत्मविश्वास आणखीनच दुणावला. माणसं जोडत गेली आणि “भिकू” फिल्म साकारली.

या फिल्म मध्ये अनेकांचे मोठे सहकार्य मला मिळालेले. मुक्ती लघुपटाने चित्रपटाची सर्व अंग मला प्रभावीपणे दाखविली. पुढे भिकू करताना मला जे काही येत होत ते आणखीन पारखून पाहता आलं.

भिकू हा कोकणातील चित्रपट रसिकांना भावला. अगदी सावंतवाडीपासून अलिबागपर्यंत अनेकांनी तो पहिला. कणकवलीत तर रसिकांच्या मागणीवरून सलग दोन दिवस ४ शो करावे लागलेत.

या चित्रपटात सर्वच कलाकार नवीन होते. चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर काम करण्याचा अनुभवही कुणाकडे नव्हता. कॅमेरा फेस कसा करायचा हे देखल बऱ्याच जणांना माहित नव्हते. अशा लोकांना घेऊन चित्रपट पुढे सरकत गेला. विशेष म्हणजे इफेक्ट्स हि चित्रपटाची बलस्थाने असतात.

एखाद्या शॉटला ट्रॉली इफेक्ट द्यायचा म्हणजे ट्रॉली आणायची कुठून ? किंबहुना ती मिळेल देखील परंतु त्याचे भाडे परवडणारे नाही. अशावेळी कांबळी यांना अफलातून कल्पना सुचली आणि मग ट्रॉली बॅगेवर कॅमेरा ठेवला गेला. पुढे काय ते चित्रपट पाहिल्यावरच आपल्याला समजेल. मात्र भिकू या चित्रपटाने कांबळींनाच नव्हे तर अनेकांना नवा आत्मविश्वास दिला.

या नंतर खऱ्या अर्थाने कोकणला नव्या माध्यमाची ओळख झाली. पुढे अनेकांनी लघुपट बनविले. चित्रपट बनविण्याचा प्रयत्नही सुरु केला. आज कणकवली सारख्या ठिकाणी डबिंगची सुविधा कांबळी यांनी उपलब्ध केली आहे. कांबळी हे स्वतः दिग्दर्शक आहेत.

सिनेमॅटिक वेडिंग्स हे अलीकडच्या काळातील वाढत जाणारे नवे दालन आहे. आणि सिनेमॅटिक असल्यामुळे आपण तेही माध्यम स्वीकारले असल्याचे कांबळी यांनी सांगितले.

कोकण हा निसर्गाचा अदभूत वरदहस्त लाभलेला प्रदेश आहे. येथील लोकेशन कुणालाही भावतील अशीच आहेत. या लोकेशनचा वापर करून चित्रपट क्षेत्राद्वारे कोकण आणखीन समृद्ध होऊ शकते. मात्र नेमके कुठे चुकतेय याचा शोध घ्यावा लागेल. दरम्यान शशिकांत कांबळी यांच्यासारख्या तरुणाचे हे प्रयत्न कोकणात नव्या विचाराची नांदी ठरत आहेत. यामुळे “गावातल्या गजालीतला कोकण आता बदालताहा” असे म्हणायला हरकत नाही.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment