महाराष्ट्र

आणि समृद्ध सहजीवनाचा धागा उसवला.

एन.डी . पाटील यांच्या पत्नी सरोज यांनी उलगडला सहजीवनपट

By : अनुराधा कदम

सहजीवन म्हणजे काय…

एकमेकांना गुणदोषासकट स्वीकारून सोबत आयुष्य जगणं हेच ना…दोन भिन्न माणसं लग्नानंतर एकत्र राहतात आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य एक होतं…

पण दोन व्यक्तींमधला हा भिन्नपणा समजून घेतला तर आयुष्य एकरूप होतं. मी समाजकार्य कधीच सोडणार नाही आणि पगाराचे पैसेही संसाराला देण्यापेक्षा गरजवंताला देईन असं स्पष्टपणे लग्नाच्या बोलणीवेळी सांगणाऱ्या नारायण पाटील तथा एन. डी. यांच्यासोबत सहजीवनाचा ६५ वर्षांचा प्रवास केल्यानंतर मी सांगू शकते.

पण या नात्याने मला खूप काही अनुभव दिले. पवारांची लेक ते पाटलांची सून या प्रवासात सामाजिक कार्यकर्ते एन. डी. पाटील यांची पत्नी म्हणून माझ्या ओंजळीत आलेल्या असंख्य क्षणांनी मला माणूस म्हणून समृद्ध केले. आज दोघांच्याही आयुष्य संध्याकाळी सहजीवनातील गुलाबी दिवसांच्या आठवणींचे संचित सरोज माईं व एन. डी. दादांनी गुंफले होते. आज एनडी दादांच्या जाण्याने एका समृद्ध सहजीवनाचा धागा उसवला.


बारामतीत पवाराचं घर म्हणजे सामाजिक बैठक भरण्याचं हक्काचं ठिकाण. आम्ही भावंडेही हेच वातावरण बघत मोठे झालो. माणसांचा राबता तर इतका की घर आणि शांतता हे समीकरणच मला आठवत नाही.

मला आठवतेय, मी बी.ए. ला होते. घरी येणाऱ्या माणसांशी आई वडील बोलायला लावत. शाळा कॉलेजात पुस्तकातून भेटणारे लेखक आमच्या घरी चर्चेला येत. ही श्रीमंती अगदी मनापासून जगले मी.

त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, नाना पाटील, दाजिबा देसाई अशी अनेक अवलियांची नेहमी उठबस. या पंक्तीत नारायण पाटील हा तरूण सामाजिक कार्यकर्ताही होता. 

अर्थात आम्हा बहिणींच्या लग्नाचा विषयही ओघाने व्हायचा. त्यावेळी दाजिबा देसाई माझ्या वडीलांना म्हणाले, नारायण चांगला मुलगा आहे.

तुमच्या मुलींपैकी एक मुलगी नारायणला द्या की. सामाजिक चर्चेच्या प्रवाहात एकदम नारायणसाठी तुमची मुलगी द्या हे वाक्य वडीलांनी ऐकलं आणि तिथंपासून माझ्या नावाशी नारायण अर्थात एन. डी. पाटील हे नाव जोडलं.लग्नाच्या रांगेत तशी मीच पुढे होते. एन. डींच्या नावाचा पर्याय आईवडीलांच्या चर्चेत आला.

आईने होकार दिला मात्र वडीलांचे मन मानायला तयार नव्हते. आता कुणालाही असेच वाटेल की नेहमी घरी येणारा, चांगला, समाजकार्याची आवड असलेला आणि शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांशी समरस असलेला मुलगा असूनही वडीलांच्या मनात एन. डी. यांच्याविषयी जावई म्हणून विचार का होत नसावा? 

मात्र तिथेच तर आमच्या पुढच्या साऱ्या सहजीवनातील चढउतारांचे, खाचाखळग्यांचे आणि समंजसपणाचे मूळ होते. झालं असं की, माझं आणि एन. डी. यांच्या लग्नाची बोलणी झाली आणि एन. डी. एकदा घरी आले. म्हणाले, माझ्या काही अटी आहेत. त्या मान्य असतील तरच माझा होकार देईन.

आता, साठेक वर्षापूर्वी मुलाकडच्या बाजूने अटी हा शब्द जरी कानावर पडला तरी त्याला शंकाकुशंकाचे कंगोरे येत. पण एन. डी. यांची अट होती की ते कधीही नोकरी करणार नाहीत. आणि जे काही पैसे मिळतील ते संसाराला देतीलच असे नाही. त्यामुळे माझ्या पत्नीने ती सांसारिक जबाबदारी बघावी.

आधीच आमच्या लग्नाला होकार देण्यासाठी हिंदोळे घेणारे वडीलांचे मन या अटीनंतर नकारावरच अडून बसलं. मात्र माझी आई खूप खंबीर होती. आईने वडीलांची समजूत घातली. मला आजही, आई जिला आम्ही बाई म्हणत असू, तिचे शब्द जसेच्या तसे आठवताहेत. ती म्हणाली होती, आपण आपल्या मुलीला इतके सक्षम बनवले आहे की कोणत्याही परिस्थितीचा सामना ती धैर्याने करेल. आणि जो मुलगा त्याचे मत स्पष्टपणे लग्नाआधीच सांगतोय, त्याला त्याच्या मनाने जगू देऊ. समाजकार्यात वाहून घेण्यासाठी म्हणून संसाराला हातभार लावणार नाही हा त्याचा दोष म्हणता येणार नाही…

सरोज सगळं निभावेल याची खात्री आहे…आईची समजूत वडीलांसाठी होती खरंतर, पण मलाही आईचा दृष्टिकोन पटला. वडीलांनी अखेर परवानगी दिली आणि माझं लग्न ठरलं यावर शिक्कामोर्तब झालं.त्यावेळी मी शिक्षणासाठी पुण्यात होते.

साधारणपणे वयाची विशीएकवीशी होती. वर्गातल्या बऱ्याच मैत्रीणींचीही लग्न ठरत होती, काहीजणींची ठरली होती. मीदेखील एन. डी. यांच्यासोबत सहजीवनाची स्वप्नं रंगवत होते. मैत्रीणी सांगायच्या की आज त्यांचा होणारा नवरा भेटायला येणार आहे. कुणाच्या होणाऱ्या नवऱ्याचं छान प्रेमपत्र यायचं.

काहीही आडपडदा न ठेवता आम्हा मैत्रींणींकडून त्या पत्राचं सामूहिक वाचनही व्हायचं आणि जिच्यासाठी ते पत्र असायचं तिला चिडवण्यात दिवस संपायचा. या सगळ्यांमध्ये मला मात्र एक गोष्ट जाणवायची की सगळ्या मैत्रीणींचे होणारे नवरे त्यांना भेटायला येतात, प्रेमपत्र पाठवतात. एन. डी. मात्र मला लग्नाआधी कधीच भेटायला आले नाहीत किंवा साधं पत्रही पाठवलं नाही.

मैत्रीणी विचारायच्या मला तेव्हा एन. डीं यांचा खूप राग यायचा. अर्थात वयाच्या विशीच्या उंबरठ्यावर विचार करण्याची रेषाही तेवढीच होती. त्या गुलाबी दिवसांनी गारूड केलं होतं. लग्न ठरलं तेव्हा जी मी एन. डीं यांना भेटले ते थेट लग्नाच्या बोहल्यावरच.

आता लग्न ठरणं आणि लग्न होणं या पिंक पिरेडमध्ये रोज भेट, चॅटिंग, गिफ्ट, सेलि​ब्रेशन हे पाहिलं, ऐकलं की वाटतं माझ्या आयुष्यातील हा पिंक पिरेड कधी आला आ​णि कधी संपला ते कळलच नाही.लग्न झालं आणि सरोज पवारांची सरोज पाटील बनून सांगलीतील ढवळी गावात आले. ढवळीतील पाटलांच्या घरी आले आ​णि आपला निर्णय चुकला तर नाही ना अशी भीतीच वाटायला लागली. बारामतीमध्ये पवार हे घर तस खाऊनपिऊन सधन होतं.

सोयीसुविधा होत्या. वैचारिक स्वातंत्र्य होते. पैशाची श्रीमंती नसली तरी मुलभूत गरजांची वानवा नव्हती. मात्र ढवळीतल्या सासरी मला पहिला धक्का दिला तो घरी संडास नाही या वाक्याने. अशी वेळ माझ्यावर माहेरी कधी आली नव्हती आणि पुढे कधी येईल याचा मी विचारही केला नव्हता.

घरात एकही गादी नव्हती. त्यात जनावरांचा गोठाही अगदी घराला खेटून असल्यामुळे शेणाचा वास घरभर पसरलेला. मी कुठे आले? हा प्रश्न विचारून विचारून स्वताला बेजार केल्याचं मला आजही आठवतंय. शेणाची मला जबरदस्त अॅलर्जी आणि घरात दुसरा वासच नाही अशी परिस्थिती.

मनाला मुरड घालून मी सून म्हणून त्या घरात रमण्याचा प्रयत्न करायला लागले. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण फक्त वरवरच्या गोष्टी पाहत आहोत. एन.डींच्या घरातील माणसं किती प्रेमळ आहेत. त्यांचे विचार किती चांगले आहेत. मला शेणाचा वास त्रास देतोय, पण या माणसांच्या प्रेमाचा गंध किती भरून पावलाय आपल्यात…सहवासातून माणूस आपला होतो.

माणसांना समजून घेता त्यांच्याविषयी मतं बनवणं म्हणजे किनाऱ्यावर बसून दगडं मारून पाण्याचा तळ मोजण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यासारखं आहे याची त्यादिवशी प्रकर्षाने जाणीव झाली. लग्नानंतर सहा महिने मी ढवळीत राहिले.एन. डी. यांचं समाजासाठी वाहून घेणं सुरूच होतं.

नव्यानवलाईचे दिवस त्यांच्या गावीही नव्हते. दरम्यान लग्नाच्या सहाव्या महिन्यात ते आमदार म्हणून निवडून आले. ढवळीतून आता आमचा मुक्काम मुंबईत हलणार होता. सासरी माणसं खूपच लाघवी होती आणि आता मीपण त्यांच्यामध्ये छान मिसळले होते. पण तरीही माझ्या त्यावेळच्या वयातील स्वभावानुसार मला मुंबईला जायला मिळणार या आनंदाने माझे मन सुखावले.

राजाराणीचा संसार असेल या विचाराने मला आनंद झाला. त्यात एन. डी. आमदार झालेत म्हटल्यावर आमदार निवास असणार, नोकरचालर असणार, सरकारकडून मिळणाऱ्या सोयीसुविधा असणार असे एकेक इमले मी रचायला लागले. आम्ही मोजक्या सामानानिशी मुंबईत आलो. लग्नाला जेमतेम सहा महिने म्हणजे तसा आमचा नवाच संसार होता. जीवाची मुंबई करायची असं मी ठरवूनच टाकलं होतं.

पण ज्या दिवशी मुंबईत आलो तेव्हा पार्ल्यातील एका चाळीतल्या दहा बाय दहाच्या खोलीत एन. डी. पाटील यांनी मला आणलं, सामान ठेवलं आणि हेच आपलं घर असं सांगून कामासाठी निघून गेले. पत्त्याचा बंगला एका हलक्याशा फुंकरने कोसळावा तसे माझ्या कल्पनाचे मजले कोसळले. एन. डी. जरी आमदार असले तरी आमदार म्हणून कोणत्याही सु​विधा घ्यायच्या नाहीत हे त्यांनी ठरवले होते.

अधिक बोलल्यानंतर मला हे कळले आणि त्यानंतर पुढची २५ वर्षे त्या एका खोलीत माझा संसार सुरू झाला. त्यानंतरच्या सगळ्या प्रवासाची मूक साक्षीदार असलेली ती खोली माझ्या नजरेसमोरून आजही हलत नाही. एन. डी. सतत कामानिमित्त बाहेर आणि मी एकटी.माझ्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी पहिल्या मुलाचा जन्म झाला तो याच चाळीतल्या खोलीत.

दोघं होतो तोवर काही चिंता नव्हती. मात्र दोघांचे तिघे आणि त्यानंतर काही वर्षातच चौकोनी संसार झाला. दोन मुलांचे संगोपन, शिक्षण, घरखर्च याचा आवाका पेलायचा कसा या प्रश्नाने मला अस्वस्थ करायला सुरूवात केली. एन.डी. एकही रूपया घरात देत नव्हते.

आमदारकीचे मानधन समाजासाठीच खर्च व्हायचे. त्यांच्याशी बोलले तर ते म्हणाले, मी आधीच सांगितले होते की मला माझी मिळकत संसाराला देता येणार नाही. काय करायचे हे तू ठरव. हे स्वीकारूनच मी नातं जोडलं होतं. खूप रडू आलं त्यावेळी. पण त्याचक्षणी आईचा चेहरा आठवला.

तिच्याशी बोलले. तिला रडलेलं अजिबात आवडत नव्हतं. ती नेहमी म्हणायची रडण्याने समस्या सुटल्या असत्या तर जगात समस्या उरल्याच नसत्या. आईने धीर दिला. म्हणाली, तुला शिकवले ते रडायला नव्हे तर लढायला. तिच्या शब्दाने बळ मिळालं.बी.ए.ची पदवी हातात होतीच, त्याच्या जोडीने बी.एड. करण्यासाठी एसएनडीटीमध्ये प्रवेश घेतला. मुलं लहान होती. एन. डी. सकाळी जायचे ते रात्रीच यायचे.

समाजासाठी त्यांनी वाहून घेतलं होतं आणि त्याची मला पूर्ण कल्पना होती. मुलं शाळेत गेल्यानंतर मी कॉलेजला जायचे. मुलांच्या गळ्यात दोरी बांधून घराची किल्ली लावून ठेवली.

शाळेतून त्यांनी घरी यावं, दप्तर ठेवावं आणि बाहेर खेळायला जावं अशी सूचना दिली. ​त्यांना भूक लागली तर खाण्यासाठी खिडकीला केळी बांधून ठेवायचे. ही कसरत सुरू होती आणि एन.डी. मात्र या कशातच नव्हते.

त्यांना घरी कधी येणार विचारलं की काम झाल्यानंतर एवढच उत्तर मला मिळालं. पण मी त्यांचं काम समजून घेतलं. वाद घालून काहीच उपयोग नव्हता. संसाराचे असेही अनुभव मी घेत होते.तिकडे बारामतीला माझ्या या संसारातील एक आहे आणि एक नाही या चित्राची जाणीव होती.

आईवडीलांची खूप मदत होती. महिन्याचा बाजार भरून दिला जात होता. त्यामुळे चणचण जाणवली नाही. मलाही जवळच्या झोपडपट्टीतील एका शाळेत नोकरी मिळाली. एन.डी. आमदार आणि मी झोपटपट्टीतील घराघरात फिरून शाळेसाठी मुलं गोळा करत होते. पण आमदाराची बायको असल्याचा आब मिरवावा असे मलाही कधी वाटले नाही आणि एन.डी. यांनीही कधी आमदाराच्या बायकोने हे असले उद्योग करू नयेत म्हणून री ओढली नाही.

सहजीवनाच्या नात्यातील सामंजस्य आम्ही दोघेही जपत होतो.मला आठवतेय, स्टोव्हच्या जमान्यात नव्यानेच गॅस आला होता. आईवडीलांना वाटले की मुलीला गॅस द्यावा. त्या काळात बुकिंग करावे लागे. मीदेखील आता नोकरी करत असल्यामुळे गाठीशी पैसा जमत होता.

वडीलांनी गॅस घेऊन दिला. त्यादिवशी रात्री एन. डी. घरी आले आणि त्यांनी गॅस पाहिला. वडीलांनी घेऊन दिल्याचे कळायला त्यांना वेळ लागला नाही. पण ते म्हणाले गॅसची शेगडी वडील घेऊन देतील, पण दर महिन्याला सिलिंडर आणणं आपल्याला परवडणार आहे का? त्यांच्या स्वाभिमानाच्या मी नव्याने प्रेमात पडले त्या दिवशी. वाटलं एन. डी. यांनी काही आपल्याला फसवले नाही, खोटं बोलले नाहीत.

माणसातला देव शोधणाऱ्या या अवलियाने आपल्या मिळकतीचा एक पै न पै समाजासाठीच दिला आहे. दहा बाय दहाच्या खोलीत आयुष्य काढतानाही मनाचा मोठेपणा काय असतो हे त्यांच्या सहवासाने शिकवले. मला वाव दिला, स्वातंत्र्य दिलं. पैशाच्या राशी उधळणारा, साड्या आणि दागिन्यांची हौस भागवणारा नवरा म्हणजे चांगला हे समीकरण फोल असू शकते हे मला त्यांनी शिकवले.

रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीवर एकाही नातेवाईकाला घ्यायचा नाही हा एन. डी. यांचा दंडक. पण या संस्थेवर माझी निवड करताना त्यांनी पत्नी म्हणून नव्हे तर एक यशस्वी मुख्याध्यापिका, उपक्रमशील शिक्षिका या गुणांना अधोरे​खित केले. मला घडवले…

विचारातून, आचारातून स्वाभिमान कसा जपायचा यासाठी.माझा वाढदिवस त्यांना आठवत नाही. लग्नाचा वाढदिवस लक्षात राहत नाही. गेल्या साठ वर्षात एकही भेटवस्तू त्यांनी मला दिलेली नाही. आजही त्यांच्या पेन्शन किंवा संस्थेच्या मिळकतीतून एकही पैसा घरखर्चासाठी देत नाहीत.

पण हेच एन.डी. मला माझे वाटतात. त्यांच्याकडे मदतीसाठी येणारा गरजवंत रिकाम्या हाती जात नाही या गोष्टीचा पत्नी म्हणून मला जो अभिमान वाटतो त्यातच आमच्या सहजीवनाचा गाभा होता.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment