विदर्भ

औरंगाबाद नागपूर एसटी बसचा उड्डाणपूलावर अपघात

अमरावती – औरंगाबाद येथून नागपूर कडे भरधाव जाणाऱ्या एसटी बसचा नांदगाव पेठ येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून यामध्ये बस चालक गंभीर जखमी झाला असून बसमधील प्रवासी मात्र सुखरूप बचावले आहेत. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी असून नांदगाव पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली व जखमी चालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नागपूर आगारची औरंगाबाद नागपूर बस क्र एम.एच.४०,वाय,५८२८ ही बस सायंकाळी साडे सहा वाजता अमरावती येथून नागपूर कडे निघाली. सात वाजताच्या दरम्यान नांदगाव पेठ उड्डाणपूलावरून जातांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस चक्क उड्डाणपुलावरील कठड्याला जाऊन भिडली.यामध्ये बस चालक खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली तर बसमध्ये असणारे ३२ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे.

घटना घडताच नांदगाव पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुरळीत करून जखमी बस चालकाला रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. उड्डाणपूलावर अडकलेली बस क्रेन च्या मदतीने बाजूला करण्यात आली यामध्ये बस चे पुढच्या भागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेचा पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे करीत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment