हिंगणघाट- जिल्यातील हिंगणघाट तालुक्यातील शीरुड गावातील आशिष वरघणे यांना, यंदाचा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अनुदान गुणगौरव जाहिर झाले. गेल्या पाऊण दशकापासून वरघणे सातत्याने विविध नियतकालिकातून तसेच दिवाळी अंकातून आपल्या कथा, कविता प्रामुख्याने प्रकाशित करीत आले. दरवर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या द्वारे ज्यांचे अद्याप एकही पुस्तक प्रकाशित नाही. अशा नवलेखकांना नवलेखक अनुदान योजना मार्फत अनुदान दिले जात असते. योजनेचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डिसेंबरच्या शेवटी करतात.
आशिष वरघणे यांनी योजनेसाठी कथा वाङमय प्रकारात आपले साहित्य पाठविले होते. दिनांक १७ डिसेंबर रोजी त्यांना ई मेल द्वारे निकाल कळला. त्यांच्या पहिल्या पुस्तकांसाठी अनुदान मिळाले असून, पुढील काही दिवसात “जगणं महाग होत आहे” या शीर्षकाखाली त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशीत होत आहे. त्यांच्या पुस्तकाला संत साहित्याचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ समीक्षक डॉ. किशोर सानप यांची प्रस्तावना लाभणार असून, पाठराखण महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांची राहणार आहे. आशिष वरघणे यांनी आपल्या गावा सोबतच जिल्ह्याचा बहुमान वाढविला आहे.