मुंबई

बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा शॉर्टकट

बदलापूर- बदलापूरमध्ये रेल्वे प्रवासी वेळ वाचवण्यासाठी जीवघेणा शॉर्टकट वापरत असल्याचं समोर आलंय. हे प्रवासी विरुद्ध दिशेने ट्रॅकमध्ये उड्या मारून लोकल पकडत असून याच वेळी दुसऱ्या ट्रॅकवरून भरधाव वेगात एक एक्सप्रेस आली. हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

बदलापूर रेल्वे स्थानकात मुंबईच्या दिशेला जाण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर ३ वर लोकल येते. ही लोकल पकडण्यासाठी प्रवासी प्लॅटफॉर्म नंबर ३ ऐवजी प्लॅटफॉर्म नंबर २ वर उभे राहतात. आणि लोकल येताच विरुद्ध दिशेने ट्रॅकमध्ये उड्या मारून ही लोकल पकडतात. गुरुवारी सकाळी अशाच पद्धतीने काही प्रवासी लोकल पकडण्यासाठी ट्रॅकमध्ये उभे असताना अचानक प्लॅटफॉर्म नंबर २ वर भरधाव वेगात एक एक्सप्रेस आली. त्यामुळे रुळात उभ्या असलेल्या प्रवाशांचीही चांगलीच भंबेरी उडाली. ही सगळी घटना अन्य एका प्रवाशाने मोबाईल कॅमेरात चित्रित केली असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. या घटनेनंतर दोन रुळांच्या मध्ये रेल्वे प्रशासनाने जाळ्या बसवण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. सोबतच प्रवाशांनीही काही मिनिटं वाचवण्यासाठी अशा पद्धतीने जीवघेणा शॉर्टकट वापरू नये, असं मत सोशल मीडियावर व्यक्त होतंय.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment