महाराष्ट्र

#Balikadin वसा आणि वारसा पुढे नेण्याचे धैर्य सावित्रीच्या लेकींमध्ये निर्माण होणे हेच त्या क्रांतिकारी माऊलीला अभिवादन ठरेल.

BY दमयंती पाटील, पुणे

सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. १८४० मध्ये महात्मा जोतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तोपर्यंत त्यांचा प्रवास सर्वसामान्य स्त्रीचा होता. लग्नानंतर जोतिबांनी त्यांचे शिक्षण सुरू केले. तिथूनच त्यांच्या असामान्य क्रांतिकारकत्वाचा प्रवास सुरू झाला.

सुरवातीला कुटुंबातील व्यक्तिंनी, समाजातील लोकांनी प्रचंड खळखळ केली. धर्म बुडाला अशी धर्माच्या रक्षकांनी हाकाटी दिली. वाळीत टाकण्याची धमकी दिली. पण जोतिबा बधले नाहीत. १८४७ पर्यंत सावित्रीबाईंनी शिक्षण प्रशिक्षकाचा कोर्स पूर्ण केला. महात्मा जोतिबा फुले यांनी सावित्रीबाईना सोबत घेवून १ जानेवारी १८४८रोजी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.

Mahatma Jotiba Phule and Savitribai Phule's Contribution Towards Women  Empowerment - Velivada - Educate, Agitate, Organize

सुमारे पावणे दोन शतकांपूर्वीची ही घटना अभुतपूर्व आणि क्रांतीकारी होती. या दांपत्याने १८५२ पर्यंत जवळपास १५ शाळा सुरू केल्या.  बहुजन समाजातील दुःख, दारिद्र्य, शोषण याचे मूळ एका अविद्येत आहे हे ओळखून ती दूर करण्याचा एकमेव उपाय म्हणजे शिक्षण सर्वांना खुले होणे हे जोतिबांनी ओळखले. केवळ ओळखून शांत राहीले नाही तर ते विचार कृतीत उतरवले.

एक माणूस शिकला तर तो एकटाच शहाणा होतो. पण एक बाई शिकली तर संपूर्ण कुटुंब शहाणं होते. हा दृष्टा विचार करून त्यांनी भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सावित्रीबाईं आद्य शिक्षिका बनल्या. पती हट्ट म्हणून त्या शिकल्या, शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. पण त्यानंतर त्यांनी विचारपूर्वक, समजून उमजून जोतिबांच्या प्रत्येक कामात साथ दिली. सहभाग घेतला. जोतिबांच्या मृत्यूनंतर ही मोठ्या धाडसाने, हिंमतीने ते कार्य पुढे नेले.

एकोणिसाव्या शतकातील काळ कसा होता? सामाजिक चालीरिती काय होत्या? स्त्रीयांचे जीवन कसे होते? याचा अभ्यास करण्याचा तसदी घ्यावी असे  आजच्या पिढीतील बहुतांश मुलींना वाटत नाही. कारण शिक्षण मिळवण्यासाठीचा संघर्ष त्यांना करावा लागला नाही.

आज त्या सुखनैवपणे शिक्षण घेत आहेत. अर्थार्जन करत आहेत. आपल्यापुरते का होईना पण आकाश शोधायला लागल्या आहेत. स्त्रीच्या जीवना भोवती आवळलेला धर्माचा, रूढींचा, परंपरांचा पाश आताशा सैल झाला आहे. कोंडलेला श्वास मोकळा झाला आहे. त्यासाठी या महामानवांचा द्रष्टेपणा, संवेदनशीलता कारणीभूत आहे. त्याकाळी सावित्रीबाईंनी दाखवलेल्या बंडखोर वृत्तीवरच आजच्या सुशिक्षित स्त्रीचे सुखाचे इमले सजले आहेत.

काय होती ती बंडखोरी? तेव्हा धर्म सांगत होता बाईने शिकू नये. सावित्रीबाईं शिकल्या. तेव्हा रितीरिवाज सांगत होता बाईने घराचा उंबरठा ओलांडून नये. सावित्रीबाईं घराबाहेर पडून शाळेत शिकवू लागल्या. मुलींना शाळेत पाठवा असं विनवणी करत, सनातन्यांच्या दगडधोंड्यांचा, शेणाचा मारा सहन करत पुण्याच्या पेठांत फिरू लागल्या. कोवळ्या वयात लग्न करून अकाली वैधव्य आलेल्या, ऐन तारूण्यात घरातीलच नातेवाईकांच्या वासनेचा शिकार होऊन गर्भवती राहिलेल्या बाईचे जीवन म्हणजे नरकयातनाच.

अशा विधवांपुढे घराच्या परसदारातील आड, विहीरी जवळ करण्यावाचून पर्याय उरत नसे. महात्मा फुल्यांनी पुण्यात पत्रके छापून अशा विधवांना आवाहन केले, ‘बायांनो आत्महत्या करू नका. माझ्या घरी या. सुखरूप बाळंत व्हा.’ महात्मा फुल्यांनी जेव्हा अशा विधवांच्या मुलांसाठी बालहत्याप्रतिबंध गृह सुरू केले तेव्हा सावित्रीबाईंनी त्या विधवांचे दायीपण स्वीकारले. जेव्हा त्या विधवा बाळंत होऊन तान्ह्या बाळाला तिथेच सोडून जात तेव्हा सावित्रीबाईंनी त्या मुलांचे आईपण स्वीकारले.

पाळणाघर सूरू करून या मुलांचा सांभाळ केला. शोषितांचे माणूसपण अधोरेखित करण्यासाठी, धर्मातील दांभिक रूढी परंपरांना चूड लावण्यासाठी जेव्हा जोतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा सावित्रीबाईं ही या कार्यात सहभागी झाल्या. जोतिबांनी उद्योग व्यवसायातून मिळवलेला पैसा आपल्या घर खर्चासाठी, हौसमौजेसाठी नाही तर या सार्वजनिक कार्यासाठी खर्च केला. सावित्रीबाईंचे बावन्न कशी सोनं आणि सुबोध रत्नाकर असे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले.

१८७७ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात सावित्रीबाईंनी मोठे काम केले. दुष्काळग्रस्त जनतेसाठी पुण्यातील लोकांमध्ये फिरून जमेल तसे धान्य, कपडालत्ता, पैसे अशा स्वरूपात मदत गोळा केली. ती गरजू, उपाशीतापाची जनतेत वाटली. या काळात त्यांचा मोठा आधार गरिब जनतेला मिळाला होता. १८९७ मध्ये पुण्यात प्लेगने थैमान घातले होते.

त्यावेळी आपल्या डॉक्टर मुलास नोकरीवरून बोलावून घेतले व त्याच्या मदतीने प्लेगच्या रूग्णांची सेवा सुरू केली. कोठे प्लेगचा रूग्ण आहे कळताच स्वत: त्या ठिकाणी जात आणि रूग्णाला अॕडमिट करण्यासाठी घेऊन येत. त्याची सुश्रुशा करत. या सेवेत व्यस्त असतानाच त्यांना ही प्लेगची लागण झाली. परिणाम व्हायचा तो झालाच. त्यातच १० मार्च १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

सावित्रीबाईंच्या कार्याची व्याप्ती एकूणच सामाजिक प्रश्नांना व्यापून उरणारी आहे. समाज शिक्षणासाठी त्यांनी उभी हयात वेचली; परंतु शिक्षण घेवून शहाणा झालेला समाज आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेत मानवी अस्तित्वालाच आव्हान देत आहे. शिकली सवरलेली पिढी मुलीचा जन्म नाकारण्यात धन्यता मानू लागली आहे. केवळ मुलगी नको म्हणून गर्भपात होत आहेत.

त्यामुळेच दर हजारी मुलांमागे मुलींच्या संख्येत घट होत आहे. या पार्श्वभूमीवर एकोणिसाव्या शतकात विधवा, बालके यांना आधार देणाऱ्या, बालहत्या प्रतिबंध गृह सुरू करणाऱ्या, अनाथांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या फुले दांपत्याचे कर्तृत्व सूर्यप्रकाशातही झळाळून उठते. जातिधर्माच्या भिंती व्यक्ती विकासाच्या आड येऊ नयेत असा विचार त्यांनी त्याकाळी मांडला.

आम्ही आजही त्या भिंती तोडू शकलो नाही. सावित्रीबाईंनी शिक्षणाला माणुसकीचे अधिष्ठान दिले. आज मात्र शिक्षण, सुशिक्षितपणाला छानछोकी जीवन, उंची कपडे, यांत्रिक सोयीसुविधा यांचे कोंदण मिळाले आहे. सुशिक्षित स्त्रीया सुरक्षित राहतीलच याची खात्री नाही. उलट स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराची आकडेवारी मन सुन्न करणारी आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडे गेल्या वर्षभरात जवळपास तीस हजार महिलांनी शारिरीक व मानसिक छळ होत असल्याची तक्रार नोंदवली आहे.

बलात्कार, घरगुती हिंसाचार, हुंडाबळी यांच्या बातम्यांनी समाज म्हणून आमच्या जाणिवा बधीर होत चालल्या आहेत. जोपर्यंत स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारणारे समाजमन तयार होत नाही. तिचा जन्माचा अधिकार हिरावून घेणे बंद होत नाही. तिचा मानसिक शारिरीक छळ बंद होत नाही. तिला स्वतंत्र व्यक्ती म्हणून फुलण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत सावित्रीबाईंनी स्विकारलेले काम, घेतलेला वसा संपला असे होणार नाही. हा वसा आणि वारसा पुढे नेण्याचे धैर्य सावित्रीच्या लेकींमध्ये निर्माण होणे हेच त्या क्रांतिकारी माऊलीला अभिवादन ठरेल.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment