महेश वाघधरे, सर्फराज मोमीन आणि मानसी साहू
सध्या मुंबई शहराच्या पश्चिम किनाऱ्यावर रस्ता बांधण्याची योजना आखण्यात येत आहे. बहुसंख्य राजकारणी आणि वाहतूक तज्ज्ञ शहरातील वाहतुकीच्या खोळंब्याच्या प्रश्नावर प्रस्तावित रस्ता हेच एकमेव उत्तर असल्याचा दावा करत आहेत. पण खरेच असे आहे का? शहरी नियोजनाचा आजवरचा इतिहास मात्र वेगळेच काहीतरी सुचवतो. आज २१व्या शतकात दाट वस्ती असलेल्या मुंबईसारख्या शहराने पाश्चिमात्य राष्ट्रांत अयशस्वी ठरलेल्या उपाययोजनांवर अवलंबून का बरे राहावे? केवळ काही मूठभर लोकांना लाभ मिळावा याकरिता सामान्य मुंबईकर नागरिकांना वाटाण्याचा अक्षता लावण्यात याव्यात का, हे प्रश्न विचारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सागरी किनारपट्टीलगतच्या या रस्त्यामुळे येत्या काही वर्षात मुंबई शहराला फायद्यांपेक्षा तोटेच अधिक का होतील, याच्या काही कारणांचा आम्ही संयुक्तिक विचार केलेला आहे.
योजनेचे कालबाह्य झालेले प्रारुप (मॉडेल)
२०व्या शतकात विकसित राष्ट्रांमधील शहरांसमोर औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेल्या वाढत्या मागणीला पुरे पडण्याचे आव्हान होते. या आव्हानाला तोंड देण्यासाठी जे शोध झाले त्यातील सर्वात प्रभावी शोध होता स्वयंचलित वाहनांचा वाढता वापर. अन्य उद्योगांप्रमाणेच स्वयंचलित वाहने प्रगती आणि विकासाची जणू मानचिन्हेच बनली. शहराच्या नियोजनकर्त्यांनी अगदी जलदगतीने हालचाली करून शहराच्या आत कारखाने कशा प्रकारे सामावून घेता येतील आणि मोटारी याच प्रवासाचे प्रमुख साधन कसे असतील, यांबाबत विशेष तरतुदी करून घेतल्या.
त्यामुळे तोवर शहरातील नागरिकांमधला शतकानुशतके असणारा नाजूक समतोल अगदी वेगळ्या प्रकारे बदलला गेला. बंदरांमुळे नदी व सागरी किनारपट्टीशेजारच्या आणि शहरातल्या मोक्याच्या जागा कारखाने आणि औद्योगिक वसाहती यांच्या वापरासाठी देण्यात आल्या. तर वेगवेगळ्या महामार्गाच्या प्रकल्पांमुळे वेगवेगळ्या समाजघटकांची विभागणी झाली. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब, कृष्णवर्णीय आणि गोरे आणि स्थानिक व स्थलांतरित अशी निवासी भागांची सरळसरळ विभागणी झाली. मोटारी आणि कारखाने यांच्यासोबतच वाढती सामाजिक असमानता, प्रदूषण, अपघात आणि जीवनशैलीमुळे होणारे आजार या गोष्टीही वाढीला लागल्या. त्यामुळे एकूणच सार्वजनिक आरोग्य आणि स्वास्थ्य या दोन्ही गोष्टी घसरणीला लागल्या.
गेल्या काही दशकांमध्ये मात्र विकसित देशांत शहरांची उभारणी करताना त्या त्या शहराचे आपल्या नागरिकांशी असणारे नाते विशेषत्त्वाने विचारात घेण्यात येते आहे. आता टप्प्याटप्प्याने कारखाने शहराबाहेर हलवले जात आहेत किंवा त्या जागी पर्यावरणस्नेही उद्योग उभारण्यात येत आहेत. त्याचवेळी जगभरातल्या साऱ्या शहरांमध्ये स्थनिक समुद्रकिनाऱ्यांशी अधिक चांगल्या प्रकारे नाते प्रस्थापित करणेही सुरू झालेले आहे. यामुळे हे जागतिक पातळीवरचे, लोकांना हवेसे वाटणारे उत्तम दर्जाचे समुद्रकिनारे बनतील. आर्थिक विकासासाठी कल्पकता आणि संशोधन या गोष्टी आवश्यक असल्या, तरी पुढच्या पिढीकरताचे निर्णय घेणारे नेते आता शहरातील नागरिक आणि खास करून पादचाऱ्यांना समोर ठेवून सार्वजनिक पायाभूत सुविधा प्राधान्याने उभारत आहेत.
आज बहुसंख्य पाश्चिमात्य राष्ट्रे आता मोटारी आणि उत्पादन करणाऱ्या उद्योगांना केंद्रित ठेवण्याची पद्धत मागे टाकून बरीच पुढे गेलेली असली, तरी भारतात मात्र त्याउलट आता कुठे हे प्रारुप वापरले जावे, अशी मागणी होऊ लागली आहे. याचा परिणाम म्हणजे आज २१व्या शतकात, आपण नियोजनाच्या आणि विकासाच्या कालबाह्य कल्पनांना कवटाळून बसलेलो आहोत. आता भारतात परदेशांतील शहरांची…