भिवंडी – हरातील मुलचंद कंपाऊंड इथं पहाटेच्या सुमारास एक जुनी दुमजली इमारत कोसळली असून या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलाकडून मलबा हटवून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
भिवंडी येथील खाडी पार भागातील शान हॉटेलच्या समोर असणाऱ्या मुलचंद कंपाऊन येथे एक दुमजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीत अडकून माजिद अन्सारी नामक या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर भिवंडी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन या इमारतीच्या ढिगाऱ्यखाली आणखी कोण अडकले आहे का याचा शोध घेतला. सध्या या घटनेत अन्य कोणीही अडकले नसल्याच सांगण्यात आल आहे.
कोसळलेली ही दोन मजली इमारत ३० ते ३५ वर्ष जुनी इमारत होती. या इमारतीत गोदाऊन्स आणि कार्यालये सुद्धा होते. तर तळमजल्यावर ८ दुकाने होती. त्यातील एक कपड्याच्या दुकानात अन्सारी हा झोपलेला होता. पहाटेच्या सुमारास इमारत कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. अत्यंत दयनीय अवस्थेत असणाऱ्या या इमारतीला महापालिका प्रशासनाने धोकादायक इमारत म्हणून घोषित केले होते का? याबाबत विचारणा करण्यात येतेय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि पोलिसानी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजीद अन्सारीचे शव बाहेर काढण्यात आले. पुढील तपास भिवंडी पोलीस करत आहेत.