धुळे – सध्या मालेगाव येथे सुरु असलेल्या प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा संत्संग कार्यक्रमासाठी धुळ्याहून जाणाऱ्या भाविकांच्या वाहनां आज आर्वी जवळ मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत भरधाव ट्रकने पुढे जाणाऱ्या दोन वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे.
मुंबई- आग्रा महामार्गावर असलेल्या स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भरधाव चालणाऱ्या वाहन चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे मागून येणाऱ्या दोन कार व त्यांच्या पाठीमागे असलेल्या ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात झाला आहे.
धुळे तालुक्यातील आर्वी येथे मुंबई- आग्रा महामार्गावर स्पीड ब्रेकरजवळ पुढील कार अचानक थांबली. यामुळे पाठीमागून भरदाव वेगाने येणाऱ्या दोनही कार एकमेकांवर जाऊन आदळल्या तर त्यांच्या पाठीमागे भरधाव वेगाने येणारा ट्रकने देखील या तीनही कारला पाठीमागून जबर धडक दिली. या विचित्र अशा भीषण अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
तीन कार व ट्रकमध्ये झालेल्या अपघातामध्ये चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वाहनातील दोन जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना धुळे शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आर्वी पोलीस ठाणे समोरच हा विचित्र अपघात झाल्यामुळे तात्काळ पोलिसांनी धाव घेत बचावकार्य करीत महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक तात्काळ सुरळीत केली आहे. याबाबत धुळे जिल्हा पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी दिलेल्या महितीनुसार, आर्वी गावाजवळ दोन वाहनांचा अपघात झाला असून सदर वाहनांना ट्रकने धडक दिली असून ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सदर घटनेचा पुढील तपास पोलिस करीत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.